राजकीय

भाजपकडून ग्वाल्हेरमध्ये ‘या’ मराठमोळ्या उमेदवाराला संधी  

ग्वाल्हेर : वृत्तसंस्था – इंदूरमधून सुमित्रा महाजन यांना उमेदवारी मिळाली नाही त्यांनी लोकसभा लढवणार नाही असे स्पष्ट केले आहे. मात्र ग्वाल्हेरमध्ये मात्र भाजपकडून एका मराठमोळ्या उमेदवाराला संधी देण्यात आली आहे. ग्वाल्हेरमध्ये भाजपकडून विवेक नारायण शेजवलकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ते ग्वाल्हेर  येथील महापालिकेचे विद्यमान महापौर आहेत. इथल्या मराठी मतदारांवर  त्यांची चांगली पकड आहे. याचा विचार करूनच त्यांना इथे उमेदवारी देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. आता ते पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत.

शेजवलकर आणि ग्वाल्हेरचे  खूप जुने नाते आहे. विवेक यांचे वडील नारायण कृष्णराव शेजवलकर हे ग्वाल्हेरमधून दोनदा खासदार झाले आहेत. ते १९७७ आणि १९८० साली ग्वाल्हेरमधून खासदार म्हणून निवडून आले. ते जनसंघ आणि भाजपचे संस्थापक सदस्यही आहेत.

भाजपाशी दृढ नाते
विवेक शेजवलकर यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं समर्थन आहे. तसंच भाजपच्या सगळ्या नेत्यांनी विवेक शेजवलकर यांच्या नावाला एकमताने पसंती दिली. शेजवलकर यांनी महापौरपदासोबतच भाजपच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारीही सांभाळली आहे. ते ग्वाल्हेर विकास प्राधिकरणाचे अध्यक्षही होते.

मध्य प्रदेशमध्ये २९ एप्रिलला मतदानाला सुरुवात होते आहे. इथे लोकसभेच्या 29 जागा आहेत. ग्वाल्हेरमध्ये मागच्या निवडणुकीत नरेंद्रसिंग तोमर यांचा विजय झाला होता. नरेंद्रसिंग तोमर यांनी मोदी सरकारमध्ये केंद्रीय मंत्रिपद भूषवलं होतं. आता विवेक शेजवलकर यांना मतदारांचा कसा प्रतिसाद मिळतो ते पाहावं लागेल.

काँग्रेसने अजून ग्वाल्हेरच्या उमेदवाराची घोषणा केलेली नाही. याआधी १९९९ मध्ये ज्योतिरादित्य शिंदे यांनी ग्वाल्हेरमधून निवडणूक लढवली होती. आता या लोकसभा निवडणुकीसाठी ज्योतिरादित्य शिंदे यांची पत्नी प्रियदर्शनी राजे शिंदे यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Back to top button