‘तिहेरी तलाक’ कायद्यास एक वर्ष पूर्ण, भाजपा साजरा करतंय ‘मुस्लिम हक्क दिन’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तिहेरी तलाक कायदा संसदेत पास होऊन एक वर्ष पूर्ण झाले. भाजपा यास ‘मुस्लिम महिला हक्क दिन’ म्हणून साजरा करत आहे. केंद्रीय अल्पसंख्यांक कार्यमंत्री मुख्तार अब्बास नकवी, कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांच्यासह अनेक मंत्र्यांनी हा ऐतिहासिक दिवस असल्याचे वर्णन करत पंतप्रधान मोदींचे कौतुक केले आणि मुस्लिम महिलांच्या सशक्तीकरणाचे श्रेय दिले.

केंद्रीय अल्पसंख्यांक कार्यमंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी शुक्रवारी सांगितले की, मोदी सरकार ‘राजकीय शोषण’ नव्हे तर ‘सर्वसमावेशक सशक्तीकरण’ च्या संकल्पातून कार्य करते आणि तिहेरी तलाक संपवून मुस्लिम समाजातील अर्ध्या लोकसंख्येमध्ये आदर, सुरक्षा आणि समानता आणण्याचे काम केले आहे.

नकवी यांनी केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद, महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांच्यासमवेत व्हर्च्युअल कॉन्फरन्सद्वारे देशभरातील मुस्लिम महिलांना संबोधित करताना म्हटले की तिहेरी तलाक संपवून मुस्लिम समाजात वर्षानुवर्षे त्रास भोगत असलेल्या महिलांना आदर, सुरक्षा आणि समानता दिली आहे. ते म्हणाले की, हा दिवस मुस्लिम महिलांच्या तिहेरी तलाकची चुकीची प्रथा, रूढी पासून मुक्तीचा दिवस आहे, हा दिवस भारताच्या इतिहासात ‘मुस्लिम महिला हक्क दिन’ म्हणून नोंदविला गेला आहे. हा दिवस भारतीय लोकशाही आणि संसदीय इतिहासामध्ये सुवर्ण पानांचा भाग असेल.

कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी ट्विट केले की, ‘आज आपण 31 जुलै 2020 रोजी मुस्लिम महिला हक्क दिन साजरा करीत आहोत. तिहेरी तलाकची प्रथा संपवून मुस्लिम महिलांना न्याय, सन्मान आणि समानता मिळवून देण्यासाठी भारतीय लोकशाहीतील हा दिवस नेहमीच सुवर्णदिन म्हणून लक्षात ठेवला जाईल.’

भाजपने ट्विट केले की, ‘शाह बानो ते शायरा बानो पर्यंत, अनेक दशकांपर्यंत मुस्लिम महिलांनी तिहेरी तलाक सहन केला आहे आणि मुस्लिम महिलांना समाजात आदर आणि समानतेच्या अधिकारापासून वंचित ठेवले गेले. 1 ऑगस्ट 2019 रोजी मोदी सरकारने तिहेरी तलाक विरोधात कायदा बनविला आणि मुस्लिम महिलांना या प्रथेपासून मुक्त केले.’

महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी ट्वीट केले की, ‘ऐतिहासिक दिवसाला एक वर्ष पूर्ण झाले, जेव्हा भारताने तिहेरी तलाकच्या दुष्कृत्यावर बंदी घातली. ‘मुस्लिम हक्क दिन’ हा खर्‍या अर्थाने महिला सशक्तिकरणाचा उत्सव आहे. आमच्या देशातील मुस्लिम महिलांसाठी लैंगिक न्याय सुनिश्चित केल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानते.’