भाजपची पहिली उमेदवार यादी उद्या होणार जाहीर !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आगामी लोकसभा निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी सर्वच पक्ष जोरदार तयारीत असल्याचे चित्र सध्या देशभर दिसते आहे. देशातील अनेक पक्षांनी आपल्या पहिल्या उमेदवारी याद्या जाहीर केल्या आहेत. त्यामुळे भाजप सुद्धा आपली पहिली उमेदवार यादी उद्या जाहीर करण्याची शक्यता आहे. या उमेदवार यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राजनाथ सिंह यांच्या नावाची घोषणा केली जाण्याची शक्यता  आहे.

गत निवडणुकीला नरेंद्र मोदी वाराणसी मतदारसंघातून निवडणूक लढले होते. आता ते तेथूनच निवडणूक लढणार असल्याचे भाजपने आधीच जाहीर केले आहे. त्याचप्रमाणे नरेंद्र मोदी यावेळी हि दोन जागी निवडणूक लढणार आहेत. मात्र त्यांचा दुसरा मतदारसंघ अद्याप समजला नाही. दरम्यान उद्या शनिवारी भाजप आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्याची शक्यता आहे. उद्या सायंकाळी भाजपच्या निवडणूक बोर्डाची बैठक होत आहे. त्या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः उपस्थित राहणार आहेत. या बैठकी नंतर भाजपकडून लोकसभेच्या पहिल्या उमेदवार यादीची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार भाजप उद्या किमान १०० उमेदवारांची नावे घोषित करण्याची शक्यता आहे. या यादीत नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह, नितिन गडकरी, सदानंद गौडा, राधामोहन सिंह यांच्या नावाची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.