‘हनुमान चालिसा’च्या कार्यक्रमात सहभागी झाल्याने भाजप नेत्या इशरत जहाँ यांना ‘धमकी’ !

कोलकाता : वृत्तसंस्था – भारतीय जनता पक्षाच्या नेत्या असणाऱ्या इशरत जहाँ यांना हनुमान चालिसा वाचन कार्यक्रमात सहभागी झाल्याने धमकी देण्यात आली आहे. इशरत जहाँ यांनी या प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. धमकी देण्यात आल्याचा आणि गैरवर्तवणूक केल्याचा आरोप इशरत जहाँ यांनी तक्रारीत केला आहे. धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाल्याने आपल्या पतीचा भाऊ आणि घरमालक धमकावत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सर्वोच्च न्यायालयात तिहेरी तलाक प्रकरणी याचिका दाखल करणाऱ्या म्हणून इशरत जहाँ ओळखल्या जातात.

भाजप समर्थकांनी हावडा येथील एसी मार्केटमध्ये आयोजित केलेल्या ‘हनुमान चालिसा पाठ’ कार्यक्रमात इशरत जहाँ यांनी सहभाग घेतला होता. यामुळेच बुधवारी मुलाला शाळेतून घेऊन घरी जात असताना जवळपास १०० लोकांनी इशरत जहाँ यांना घेरलं आणि हिंदू कार्यक्रमात सहभागी होण्यावरुन आक्षेप नोंदवला. तुम्ही हिजाब घालून हनुमान चालिसा कार्यक्रमात सहभागी का झालात. अशी विचारणा घेरलेल्या जमावाने केली. यावेळी इशरत जहाँ यांना धमकी देखील देण्यात आली. घर सोडा अन्यथा आम्ही जबरदस्तीने बाहेर काढू अशी धमकी जमावाने दिल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

“मला जीवे मारण्याची धमकी मिळत आहे. मी सुरक्षेची मागणी करते. मी माझ्या मुलासोबत एकटी राहते. माझ्यासोबत कधीही काहीही होऊ शकतं” अशी भीती इशरत जहाँ यांनी व्यक्त केली आहे.

इशरत जहाँ यांना कुटुंबीयांकडूनही धमकी

पोलिसांनी आपण याप्रकरणी तपास सुरु केला असून योग्य ती कारवाई केली जाईल. असं आश्वासन दिलं आहे. “आपण एका धर्मनिरपेक्ष देशात राहत असून कोणत्याही धार्मिक कार्यक्रमात सहभागी होणे. आपला घटनात्मक हक्क आहे”, असं इशरत जहाँ यांनी पोलीस तक्रारीत म्हटलं आहे. “मी एक सुजाण नागरिक म्हणून माझं कर्तव्य पार पाडलं आहे. मी धर्मनिरपेक्ष व्यक्ती आहे. मला माझ्या कुटुंबीयांकडूनही जीवे मारण्याची धमकी मिळत आहे”, असं इशरत जहाँ यांनी म्हटलं आहे.

कोण आहेत इशरत जहाँ ?

तिहेरी तलाक प्रकऱणी न्यायालयात याचिका करणाऱ्या पाच महिलांपैकी एक इशरत जहाँ आहेत. २२ ऑगस्ट २०१७ रोजी सर्वोच्च न्यायालायने तिहेरी तलाक पद्दत रद्द केली होती. पतीने दुबईतून फोनवरुन तलाक दिल्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.