भाजप कार्यकर्त्याची ‘आत्महत्या’, चिठ्ठीत लिहीलं धक्कादायक ‘कारण’

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनालइन – चार दिवसांपूर्वी पलूस तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आनंदराव पाटील यांचा खून केल्याची घटना घडली होती. ही घटना समोर आली असतानाच औरंगाबादमध्ये एका भाजप कार्यकर्त्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. पंकज संकपाळे असे आत्महत्या करणाऱ्या भाजप कार्यकर्त्याचे नाव आहे.

आत्महत्येपूर्वी पंकज यांनी सुसाइड नोट लिहून ठेवली आहे. या सुसाईड नोटमध्ये त्यांनी जीवन संपवण्यामागचे धक्कादायक कारण लिहलं आहे. पंकज संकपाळे हा भाजपचा कार्यकर्ता असून तो माहिती व अधिकारामध्ये काम करतो. याच कामाअंतर्गत त्याच्यावर काही खोटे गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणांमुळे त्याला नैराश्य आले होते. त्याची न्यायालयीन लढाई सुरु होती, अशी माहिती देण्यात आली आहे.

मात्र, त्याला उस्मानपुरा पोलीस ठाण्यातील पोलीस त्रास देत होते. पोलिसांच्या त्रासाला कंटाळून पंकजने आत्महत्या करण्याचं टोकाचं पाऊल उचललं असा आरोप करण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंकज याने आत्महत्येपूर्वी लिहलेल्या सुसाईड नोटमध्ये पोलिसांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे लिहले आहे. तसेच तीन पोलिसांची नावे या चिठ्ठित लिहण्यात आली आहेत. यामध्ये उस्मानपुरा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक चंदन शेळके यांच्यासह दोन पोलिसांची नावे आहेत.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटी रुग्णालयात पाठवला. दरम्यान, पोलिसांच्या त्रासाला कंटाळून पंकजने आत्महत्या केली. जोपर्यंत या पोलिसांवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे.