‘भाजप’च्या उमेदवाराला पाडणे हेच ध्येय : भाजपचे नाराज आमदार अनिल गोटे

तब्बल २६ वर्षांनी घेतली शरद पवारांची भेट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आगामी लोकसभा निवडणुका काही दिवसांवरच येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे अनेक पक्षांची युती-आघाडीची, पाठिंब्याची समीकरणे जुळवण्याची कामे सुरु आहेत. तर काही नाराज, बंडखोर उमेदवारांची पक्षांतरे सुरु आहेत. धुळ्याचे भाजपचे नाराज आमदार अनिल गोटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज तब्बल २६ वर्षांनी भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

धुळे महापालिका निवडणुकीपासून नाराज असलेल्या गोटे यांनी भाजप खासदाराविरोधात निवडणूक लढवण्याची भूमिका घेतली आहे. त्या पार्श्वभूमीवर अनिल गोटे वैर विसरुन शरद पवार यांच्या भेटीला गेले होते. भेटीनंतर अनिल गोटे म्हणाले की, ‘राजकारणात कुणी कुणाचा कायमचा शत्रू नसतो. भाजपच्या उमेदवाराला पाडणे हेच माझे एकमेव ध्येय आहे. त्यासाठीच मी शरद पवारांची भेट घेतली आहे. ‘शरद पवार यांनी सांगितले की आघाडीत धुळ्याची जागा काँग्रेसकडे आहे, आम्ही आघाडीधर्म मोडणार नाही. स्थानिक पदाधिकाऱ्यांशी बोलून पवारसाहेब कळवतील, अशी माहितीही अनिल गोटेंनी दिली. तसेच आपण पुन्हा एकदा शरद पवारांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

अनिल गोटे आणि सुभाष भामरे वाद –

धुळे लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. सुभाष भामरे आणि आमदार अनिल गोटे यांच्यातला वाद सर्वश्रुतच आहे. काही महिन्यापूर्वीच धुळे महापालिका निवडणूक झाली. यावेळी अनिल गोटे यांनी भाजपविरोधात भूमिका घेतली होती. भाजपचेच असलेल्या अनिल गोटे यांनी गिरीश महाजन आणि केंद्रीय मंत्री सुभाष भामरे यांना कडाडून विरोध केला होता. तसेच त्यांची  सभाही उधळून लावली होती. अनिल गोटे यांचे मंत्री सुभाष भामरे यांच्याशी वाद सुरु होते. भाजपकडून दगाफटका झाल्याचा आरोप करत धुळे मनपा निवडणुकीपूर्वीच अनिल गोटे यांनी नव्या पक्षाची स्थापना करण्याची घोषणा केली होती. तेलगी प्रकरणानंतर गोटे आणि पवार यांच्यात संघर्ष टोकाला गेला होता. अनिल गोटे यांनी शरद पवारांवर नेहमीच टोकाची टीका केली आहे. मात्र, आज ते सर्व मतभेद बाजूला ठेवत अनिल गोटे आणि शरद पवार यांची भेट झाली.