‘मी आजही संयम ठेऊन आहे’ याचा अर्थ काय ? भाजप नेत्याचा आदित्य ठाकरेंना थेट सवाल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   सुशांत सिंह राजपूत प्रकरणात आरोप झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी वापरलेल्या एका वाक्यावरून भाजपनं आता त्यांना घेरलं आहे. आदित्य ठाकरे यांच्या त्या विधानाचा अर्थ लोकांनी कसा घेयचा, असा सवाल भाजपचे महाराष्ट्र प्रवक्ते, आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे.

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या मी आजही संयम ठेऊन आहे, या विधानाचा अर्थ काय, ते धमकी देत आहेत का आणि संयम सुटल्यावर ते काय करणार, असे प्रश्न भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी उपस्थित केले आहेत. अभिनेता सुशांतसिंह आत्हत्येच्या तपासासंदर्भात ठाकरे यांच्या अन्य काही विधानावरून कायदेशीर पावलं उचलण्याचा इशाराही भातखळकर यांनी दिला आहे. सुशांत सिंह प्रकरणी भाजप नेत्यांच्या वक्तव्याचा आदित्य ठाकरे यांनी समाचार घेताना वरील उद्गार काढले होते. त्याला भातखळकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

मागे राज्य मंत्रीमंडळातील एका सदस्यावर सामान्य नागरिकाला आपल्या बंगल्यावर मारहाण केल्याचा आरोप होता. संयम सुटणे म्हणजे तशा पद्धतीचे काही करणे, असा अर्थ लोकांनी घ्यावा का, हे देखील राज्याच्या जनतेला कळायला हवे. पर्यावरण मंत्र्यांच्या विधानामुळे लोकांच्या मनात असे अनेक प्रश्न निर्माण झाले तर त्याला जबाबदार कोण, असेही अतुल भातखळकर यांनी आपल्यात पत्रातून विचारले आहे.
मुंबई पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत, असं आदित्य ठाकरे म्हणतात. परंतु 50 दिवसानंतर साधा एफआयआर दाखल केलेला नाही, त्या प्रकरणाचा पोलीस सखोल तपास कसा करत आहेत याचेही कायदेशीर ज्ञान महाराष्ट्राच्या जनतेला त्यांनी देयला हवे. आदित्य ठाकरे हे पार्यावरण मंत्री आहेत. कोणत्याही फौजदारी प्रकरणाचा तपास गृहखात्याच्या अंतर्गत येतो, असे असताना या प्रकरणाचा पोलीस सखोल तपास करत आहेत हे त्यांना कसे कळले ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

गेल्या काही दिवसांत ते मुंबईच्या पोलीस आयुक्तांना भेटले अशी देखील चर्चा आहे. या दरम्यान त्यांनी ही सखोल तपासाची माहिती आपणहून घेतली की पोलीस आयुक्तांनी त्यांना दिली याचाही त्यांनी खुलासा करावा. कोणत्याही फौजदारी प्रकरणाची माहिती आरोपपत्र दाखल होईपर्यंत तपास अधिकारी कोणालाही देऊ शकत नाही असे असताना पोलीस सखोल तपास करत आहेत हे आदित्य ठाकरे यांना कसे समजले ? याचा तातडीने खुलासा न केल्यास या संदर्भात योग्य ती कायदेशीर पावलं आपण उचलू, असा इशारा अतुल भातखळकर यांनी दिला आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like