भाजप नेते अतुल भातखळकरांचा ठाकरे सरकारवर घणाघात, म्हणाले – ‘शरजिल उस्मानी हा ठाकरे सरकारचा…’

मुंबईः पोलीसनामा ऑनलाईन – काही दिवसापूर्वी पुण्यात एल्गार परिषदेत हिंदू धर्माविषयी आपत्तीजनक व भडकावू विधान केल्याप्रकरणी अलीगढ मुस्लीम विद्यापीठाचा माजी विद्यार्थी नेता शरजील उस्मानी याच्यावर स्वारगेट पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. त्याच्यावर कारवाई करावी यासाठी भाजपाने आक्रमक भूमिका घेतली होती. दरम्यान उस्मानी हा पुण्यात येऊन गपचूप जबाब नोंदवून निघून गेल्याचे समोर आल्यानंतर भाजपाने ठाकरे सरकारवर पुन्हा एकदा घणाघाती टीका केली आहे. शरजील उस्मानी हा ठाकरे सरकारचा जावई आहे हे काल पुन्हा सिद्ध झाले, असा टोला भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी लगावला आहे.

अतुल भातखळकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, एल्गार परिषदेत केलेल्या हिंदूविरोधी वक्तव्याबाबत पोलिसांकडे जबाब नोंदवण्यासाठी उस्मानी पुण्यात आला अन् गपचूप निघून गेला. सरकारने इतकी गोपनीयता पाळली की या कानाचे त्या कानाला कळले नाही. हे तर दाढ्या कुरवळणारे सरकार आहे. दरम्यान एल्गार परिषदेत चिथावणीखोर भाषण दिल्याबद्दल पुण्यात नोंदविलेला गुन्हा रद्द करावा यासाठी शरजिल उस्मानीने काही दिवसांपूर्वी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. एल्गार परिषदेतील भाषण आक्षेपार्ह नसल्याचे त्याचे म्हणणे आहे.