भाजप नेत्याचा ठाकरे सरकारवर निशाणा, म्हणाले – ‘राज्यपालांना विमानातून उतरवणार्‍या सत्ताधार्‍यांनी राज्यघटना शिकवू नये’

पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या 7 महिन्यांपासून विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त आमदारांचा प्रश्न प्रलंबित आहे. यावरून शिवसेनेने सामनातून भाजपा आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीका केली आहे. राज्यपाल महोदय, फाईल कपाटात दाबून ठेवण्यासाठी आहे की निर्णय घेण्यासाठी आहे? या न्यायालयीन ताशेऱ्यास राज्यपालांनी गांभीर्याने घेतले तर बरेच आहे. महाराष्ट्राच्या संयमाचा बांध फुटेल, असे कोणीही वागू नये. महाराष्ट्र पुरोगामी, संयमी आहे म्हणजे तो भेकड आहे असे मानू नये, असे शिवसेनेने थेट राज्यपालांना सुनावले आहे. दरम्यान यावरून भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेला ट्विट करून सुनावाले आहे. भातखळकर म्हणाले, 12 आमदारांची नियुक्ती थांबवण ही घटनेची पायमल्ली, सामना जनतेने दिलेल्या कौलाची पायमल्ली करून विश्वासघाताने सरकार स्थापन करणाऱ्या आणि राज्यपालांना विमानातून उतरवणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी राज्यपालांना राज्यघटना शिकवू नये, असे म्हटले आहे.

काय केली शिवसेनेनी टीका?
राज्यातील विरोधी पक्ष सध्याचे सरकार आपण घालवू या फाजील विश्वासावर जगत आहे. पण हा विश्वास म्हणजे ऑक्सिजन नसून कार्बन डाय ऑक्साईड आहे. विषारी वायू आहे. मोडतोड तांबा-पितळ मार्गाचा अवलंब करून जुगाड करता आले, तर त्या जुगाड योजनेत सहभागी होणाऱ्यांवर खिरापतीसाठी या 12 आमदारकीचे तुकडे फेकता येतील, असे हे स्वच्छ भारत अभियान आहे आणि त्या योजनेंतर्गत 12 आमदारांच्या नियुक्त्या रखडवून ठेवल्या आहेत. पण ही जुगाड योजना अंमलात येण्याचे स्वप्न साकार होण्याची शक्यता नाही, असे म्हटले आहे. दरम्यान पंतप्रधानांनी गुजरातच्या वादळग्रस्तांना 1000 कोटी दिले. मग महाराष्ट्रावर अन्याय का करता? माझ्या राज्यालाही 1500 कोटी द्या, अशी मागणी करून राज्यपालांनी मराठी जनतेची मने जिंकली पाहिजेत. हे सर्व करायचे सोडून राज्यपाल 6 महिन्यांपासून एका फाईलचे राजकारण करीत आहेत. आता तर ती फाईलही भुतांनी पळविली. राजभवनात अलीकडे कोणत्या भुताटकीचा वावर वाढला आहे? एकदा शांतीयज्ञ करून घ्यावा लागेल, असा सल्ला देत शिवसेनेने राज्यपालांवर खोचक टीका केली आहे.