’18 ते 45 वयोगटातील सर्वांना मोफत लस द्या’; भाजप आमदाराची मागणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन : देशभरात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार, आता 18 वर्षांवरील सर्वांना एक मेपासून लस दिली जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, केंद्र सरकारच्या माध्यमातून 50 टक्के लस मोफत दिली जाणार आहे. त्यानंतर आता 18 ते 45 वयोगटातील सर्व नागरिकांना राज्य सरकारच्या कोट्यातून मोफत लस दिली जावी, अशी मागणी भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

18 वर्षांवरील सर्वांना लस देण्यास परवानगी केंद्र सरकारने दिली आहे. यातील 50 टक्के लस ही केंद्र सरकारच्या माध्यमातून मोफत दिली जाणार आहे. त्यावरून अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारने त्यांच्या कोट्यातून मोफत लस देण्याची व्यवस्था करावी, असे म्हटले आहे. बिहार, मध्यप्रदेश यांसारख्या अनेक राज्यांनी मोफत लस देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या जास्त आहे. त्यामुळे लोकांचा मोठ्या प्रमाणावर रोजगार बुडाला आहे. सध्याच्या परिस्थितीत टाळेबंदी लावण्याच्या आधीसुद्धा महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात दोन-दोन आठवडे टाळेबंदी लावण्यात आली होती. त्यामुळे लोकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांना सरकारने आता तरी मदत करावी, असे भातखळकर म्हणाले.

दरम्यान, महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊननंतर कोणतेही पॅकेज किंवा मदत सर्वसामान्यांना केली नाही. त्यामुळे अकार्यक्षम सरकार अशी बिरुदावली मिरवणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने लसीकरण कार्यक्रमात आपली अकार्यक्षमता न दाखवता सर्व बाबी लक्षात घेऊन 18 ते 45 वयोगटातील सर्व नागरिकांना आपल्या कोट्यातून मोफत लस द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.