‘घ्या निवडणुका, महाविकासला बहुमत मिळालं तर…’, भाजपा आमदाराचं शिवसेनेला खुलं ‘आव्हान’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –   राज्यातील 12 हजार 711 ग्रामपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकांचे निकाल सोमवारी (दि. 18) जाहीर झाले. मात्र निकालावरून अद्यापही सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजपात दावे-प्रतिदावे केले जात आहेत. दरम्यान यावरून आता भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. भातखळकर म्हणाले की, ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा नंबर वन आहे, परंतु तरीही भाजपाची माती झाल्याचा दावा शिवसेना करत असेल तर घ्या निवडणुका. MVA (महाविकास आघाडी) ला बहुमत मिळाले तर जनतेच्या विश्वासघाताच्या आरोपातून मुक्ती मिळेल. है हिंमत? असे खुले चॅलेंज त्यांनी शिवसेनेला दिले आहे

ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वाधिक ग्रामपंचायती भाजपानेच जिंकल्याचा दावा भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस करत आहेत. तर महाविकास आघाडीला जनतेने साथ दिली आहे, त्यामुळे जनतेचा सरकारला कौल नाही असे म्हणणा-यांच्या घरावरील कौल जनतेने काढून घेतली आहेत,असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विरोधकांना लगावला होता. त्यावर भाजपा आमदार भातखळखर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

दरम्यान निवडणूक निकालावर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले होते की, राज्यातील गावागावातील लोकांनी भाजपला समर्थन दिलं आहे. राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा नंबर एकचा पक्ष बनला आहे. शिवसेना हा काही महाराष्ट्रव्यापी पक्ष नाही. पण भाजपचे असे नाही. भाजप संपूर्ण महाराष्ट्रात आहे. आम्हाला तिन्ही पक्षांच्या विरोधात यावेळी लढावे लागले. त्यामुळे आम्हाला आता संपूर्ण महाराष्ट्रात स्पेस आहे असे त्यांनी सांगितले.