मुख्यमंत्र्यांच्या भाषणात ‘दिलासा’ कमी अन् ‘खुलासे’ जास्त, भाजपची टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बऱ्याच दिवसांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक गोष्टींवर भाष्य केलं. पण मुख्यमंत्र्यांचे हे भाषण भाजपला रुचलेलं दिसत नाही. भाजपने या भाषणावर टीका केली असून मुख्यमंत्र्यांच्या भाषणात दिलासा कमी आणि खुलासेच अधिक असतात, अशी खोचक टीका भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विटरवरुन केली आहे.
आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. घरी बसून वैताग आला की थोडा चेंज, थोडा विरंगुळा म्हणून मुख्यमंत्री ‘कॅमेऱ्या’ समोर येत असावेत. कारण त्यांच्या भाषणात मरण यातना भोगणाऱ्या मराठी माणसांसाठी दिलासा कमी आणि खुलासे जास्त असतात, अशी टीका त्यांनी केली आहे.

काही लोक महाराष्ट्राला बदनाम करत आहेत, हा मुख्यमंत्र्यांचा आरोप भातखळकर यांनी खोडून काढला. महाराष्ट्राला बदनाम मुख्यमंत्रीच करत आहेत. राज्यात लोकांचा मृत्यू होत आहे. पत्रकार दगावत आहेत. महाराष्ट्र देशात कोरोनाची कॅपिटल झाली आहे, ही महाराष्ट्राची बदनामी नाही तर काय आहे ? असा सवाल भातखळकर यांनी केला आहे. वृद्ध नौदल अधिकाऱ्याला केलेली मारहाण आणि त्याचे निलाजरे समर्थन ही पापे केल्यानंतर बदनामी करायला दुसरे कोणी कशाला हवे ? आपले प्रवक्ते त्यासाठी एकटे पुरसे आहेत, असा संतापही त्यांनी व्यक्त केला आहे.

अतुल भातखळकर यांनी म्हटले की, महाराष्ट्राला नाहक बदनाम कुणीही करत नाही, ठाकरे सरकारचा चेहरा मात्र काळा ठिक्कर झाला आहे. तोही तुमच्या स्वत:च्या कर्माने. तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही. बरेच महिने घरी बसून तसा गैरसमज झाला असेल तर तो घरबसल्या दूर करा, असा चिमटाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना काढला आहे. तसं ट्विट अतुल भातखळकर यांनी केले आहे.