भाजप नेत्याचा घणाघात, म्हणाले – ‘शिवसेना म्हणजे दुतोंडी गांडूळ’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना म्हणजे दुतोंडी गांडूळ आहे. भाजपचे माजी राज्यसभा खासदार एम.जे.अकबर यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप झाले, तेव्हा बोंबाबोंब करणाऱ्या शिवसेना नेत्यांनी आता राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंसाठी जोरदार बॅटिंग करत आहेत. शिवसेना अकबर यांच्या प्रकरणावर वेगळी भूमिका घेते आणि मुंडे प्रकरणावर वेगळी भूमिका घेत आहे. या बोटाची थुंकी त्या बोटावर फिरविण्यात शिवसेनेचा हात कोण धरेल? अशी घणाघाती टीका भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

आमदार भातखळकर यांनी मुंडे प्रकरणात आक्रमक भूमिका घेत याआधीच निवडणूक आयोगाला पत्र लिहीले आहे. मुंडे यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात दुसरी पत्नी आणि मुलांची माहिती लपवली आहे. त्यामुळे त्यांनी एकाप्रकारे खोटी माहिती सादर करून नियमांची पायमल्ली केली असल्याने त्यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करावी, अशी मागणी आ. भातखळकर यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.