काय सांगता ! होय, 6 वी पास असणार्‍या भाजप आमदारानं डॉक्टर बनून कोविड वार्डात दिलं ‘इंजेक्शन’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना अनेकांकडून लोकांना मदत केली जात आहे. काही नेत्यांकडून देखील लोकांना मोठ्या प्रमाणात मदत पुरवली जात आहे. मात्र काही नेते मदत करायची सोडून केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी काय करतील याचा नेम नाही. असाच एक प्रकार गुजरातच्या सुरतमध्ये समोर आला आहे. जनतेमध्ये आपली प्रतिमा चांगली रहावी आणि प्रसिद्धी मिळावी यासाठी एक राजकीय नेता चक्क डॉक्टर बनला. एवढेच नाही तर त्यांनी कोविड केअर सेंटरमध्ये जाऊन रुग्णांना इंजेक्शन दिले.

सूरतमधील एका सहावी पास असलेल्या भाजप आमदाराने डॉक्टर बनून कोविड सेंटरमध्ये रुग्णाला इंजेक्शन दिले. हे आमदार महाशय कोरोना रुग्णांसाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची पाहणी करण्यासाठी कोविड सेंटरमध्ये पोहचले. याठिकाणी ते चक्क डॉक्टरच्या भूमिकेत गेले. एवढंच नाही तर या महाशयांनी इंजेक्शन हातात घेऊन ते रुग्णांना देण्याचा प्रताप केला. आमदारांचे या प्रतापाचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे.

सूरत येथील सरथाना परिसरातील एका आयसोलेशन सेंटरमध्ये भाजपचे आमदार व्हीडी झालावडिया परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी कोविड सेंटरमध्ये गेले होते. कोविड वॉर्डात रुग्णांवर उपचार सुरु असताना ते सिरींज घेऊन थेट वॉर्डात गेले आणि तेथील रुग्णावर उपचार करण्यास सुरुवात केली. एवढेच नाही तर सहावी पास अलेल्या आमदाराने नर्सच्या हातातून इंजेक्शन घेऊन ते भरलं आणि रुग्णाला दिलं देखील.

रुग्णांवर उपचार सुरु असताना रुग्णाला लावण्यात आलेल्या सलाइनमध्ये ते इंजेक्शन भरत असतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. तसेच याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हयरल झाला. या प्रकारानंतर आमदार झालावडिया यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. आपल्यावर टीका होत असल्याचे समजल्यावर झालावडिया यांनी यामागे काँग्रेसचा हात असल्याचा आरोप केला आहे. नाहक बदनामी करण्यासाठी काँग्रेसच्या लोकांकडून असे फोटो व्हायरल केले जात असल्याचे त्यांनी म्हटले.

या घटनेवर स्पष्टीकरण देताना आमदार झालावडिया यांनी सांगितले की, मागील 40 दिवसांपासून मी या आयसोलेशन सेंटरमध्ये रुग्णांची सेवा करत आहे. रुग्णांना देण्यासाठी जे रेमडेसिव्हीर इंजेक्शन सलाइनमध्ये मिसळले जाते ते इंजेक्शन मी फक्त भरलं आहे. कोणत्याही रुग्णाला मी इंजेक्शन दिलेलं नाही. यावेळी माझ्यासोबत 10 ते 15 डॉक्टर देखील त्याठिकाणी उपस्थित होते, असे त्यांनी सांगितले. तसेच भाजपच्या वतीने वराछा आणि कामरेज विधानसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात काम केले जात आहे. याला काँग्रेस नेते विरोध करत आहेत. त्यांना काहीच करायचे नाही फक्त टीका करुन नाहक बदनामी करायची हा त्यांचा डाव आहे, असाही आरोप झालावडिया यांनी केला.