Pune News : गावांच्या महापालिकेत समावेशाचं एका आमदारानं केलं स्वागत; भाजपला घरचा ‘आहेर’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – बुधवारी (ता.२३) रोजी राज्य शासनाने पुणे महापालिकेत २३ गावांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला. महाविकास आघाडीनं याचं स्वागत केलं. परंतु, राज्यातील विरोधी पक्ष व पुणे पालिकेत सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या वतीने मात्र नाराजी सूर उमटत आहे. अशी परिस्थिती असली तरी दुसरीकडे शहरातील भाजपच्या एका आमदारानं मात्र या निर्णयाचं स्वागत केलं.

आता पालिकेत २३ गावांची भर पडली. परिणामी, विकासकामांसाठी खर्चाचा मेळ बसविताना प्रशासनाची तारांबळ होणार आहे. आणि नव्याने समाविष्ट गावातील नागरिकांची मात्र फरफट होणार आहे.याबाबत सरकार काहीच विचार केल्याचं दिसत नाही. अशी नाराजी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, राज्य सरकारनं हा निर्णय राजकीय हेतू समोर ठेऊन आणि घिसाडघाईने घेतला आहे. अधिसू्चना काढताना घाई गडबडीत घेतला आहे. गावातील नागरिकांच्या अपेक्षा धुडकालावल्या आहेत. पालिकेत समावेश झाल्यानंतर या गावांच्या विकासासाठी सरकार किती निधी देणार कारण कोरोनाच्या संकटामुळे पालिकेचे उत्पन्न घटले आहे. “न्यायालयाच्या आदेशानुसार ही २३ गावे टप्प्याटप्प्याने पालिकेत समाविष्ट होणार होती. ती आता झाली आहेत. या २३ गावांच्या विकासासाठी नऊ हजार कोटींची निधीची आवश्यकता आहे. त्यानुसार, तो निधी उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी द्यावा.” असं पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं.

यावेळी, आमदार तापकीर म्हणाले, “माझ्या मतदारसंघातील सात गावांचा बुधवारी महापालिकेत समावेश झाला आहे. गावांचा पालिकेत समावेश व्हावा. यासाठी मी गेली काही वर्ष विधानसभेत देखील मागणी केली होती. हवेली तालुका नागरी कृती समितीच्या सोबत मी होतो. युती सरकार असताना १९९७ गावांचा समावेश केल्यानंतर त्यांचा सर्वांगीण विकास झाला. अशाच पद्धतीने आता घेतलेल्या २३ तेवीस गावांचा आणि यापूर्वी घेतलेल्या ११ गावांचा विकास करावा. १९९७ पेक्षा सध्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झालेले आहे. यामुळे तातडीने या ठिकाणी पायाभूत सुविधा देण्यासाठी महापालिकेने सुरवात करणे गरजेचे आहे.राज्य सरकार आणि महापालिका यांनी मिळून या गावांसाठी निधी द्यावा. पूर्वी घेतलेल्या ११ गावात आरोग्य सुविधा पूर्णपणे पालिका अद्याप देत नाही. गावाचा विकास करताना तेथील जमा झालेला कर त्याच परिसरात विकास निधी म्हणून वापरावा. आरोग्य, अंगणवाडी, शाळेतील शिक्षक या बाबतीत देखील राज्य शासनाने तातडीने निर्णय घेणे अपेक्षित आहे.” गावांच्या समावेशाचे स्वागत खडकवासल्याचे आमदार भीमराव तापकीर यांनी मात्र जाहीर स्वागत केले आहे.

तापकीर यांच्या मतदारसंघातील आता सात गावांचा तर दोन वर्षांपूर्वी तीन अशा दहा गावांचा पालिकेत समावेश झाला आहे. यामुळे, या गावांचा विकास करताना व्यापक विचार केला जातो. ग्रामपंचायतपेक्षा महापालिकेला थेट निर्णय घेता येतो. यामुळे, मतदार संघातील कचऱ्याचा मोठा प्रश्न आहे. त्याबाबत पालिका पातळीवर निर्णय घेतला जाणार आहे.आमच्या पक्षाने पक्ष पातळीवर घेतलेली भूमिका आहे. राजकीय हेतू न ठेवता हा निर्णय घेतला पाहिजे होता. आणि गावे घेताना त्यांच्या विकासासाठी राज्य सरकारने निधीची मागणी केली आहे. गावे घेण्याबाबत विरोध केलेला नाही. तसेच मी मतदार संघाच्या हिताच्या निर्णयाच्या बाजूने भूमिका घेतली आहे. असं ही आमदार तापकीर यांनी स्पष्ट केलं.

कोंढवे धावडे, शिवणे, उत्तमनगर व न्यू कोपरे या गावातील मुख्य व अंतर्गत रस्ते, नांदेड शिवणे नदीवरील पूल अशा अनेक कामे मार्गी लागतील. याचा फायदा तापकीर यांना होणार आहे. त्यांनी पहिल्यापासून या गावांच्या समावेशाबाबत सकारात्मक भूमिका घेतली होती. हवेली तालुका नागरी कृती समितीला देखील मदत केली होती. तसंच खडकवासला, नांदेड, नांदोशी, नऱ्हे किरकटवाडी या गावांच्या पिण्याच्या पाण्याबाबत योग्य व्यापक भूमिका घेतली जाईल. कोंढवे धावडे, शिवणे, उत्तमनगर व न्यू कोपरे या गावाच्या सध्याच्या पाणी वितरण व्यवस्था सुधारित होईल.