मायावती ६० वर्षाची झाली तरी रोज करते फेशियल; भाजपच्या ‘या’ आमदाराची टीका

लखनऊ : वृत्तसंस्था – मायावती स्वतः ६० वर्षाची झाली तरी फेशिअल करते, डोक्याला डाय करते आणि मेकअप करून फिरते अशी आक्षेपार्ह टीका भाजपचे आमदार सुरेंद्र नारायण सिंह यांनी बसपा प्रमुख मायावती यांच्यावर केली आहे. हा व्हिडीओ एएनआय या वृत्तसंस्थेने दिला असून मायावतींनी मोदींच्या शैलीवर टीका केली होती त्याला सिंह यांनी प्रत्यत्तर दिले आहे.

याबाबत बोलताना सुरेंद्र नारायण सिंह म्हणाले, ‘मायावती काय आमच्या नेत्याला शौकीन म्हणते, ती स्वत:च किती शौकीन आहे. स्वच्छ आणि टापटीप राहणं म्हणजे शौकीन असणं नाही. तर वय ओलांडल्यावरही तरुण राहण्याचा प्रयत्न करणं म्हणजे शौकीन असणं. आज ६०ची झाली तरी मायावती फेशियल करते. चेहऱ्याला तरुणीसारखी रंगरांगोटी करते. पांढरे केस दिसायला नको म्हणून कलर लावते. ती कोणत्या तोंडाने मोदींवर टीका करणार?’

दरम्यान लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येते आहे तसे वाचाळवीर नेत्यांची एक से बढकर एक विधाने समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी तेलुगू देसम पार्टीचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांनी प्रशांत किशोरला बिहारचा लुटारू म्हटले होते. तर हरयाणातील एका भाजप नेत्याने राहुल गांधींनी नावासमोर पप्पू लावावे अशी विनंती केली होती.