उर्मिला मातोंडकर यांना सेनेत प्रवेश म्हणजे महिला कार्यकर्त्यांचे अवमूल्यन : प्रवीण दरेकर

मुंबई : पोलीसनामा ऑनसाईन –   बॉलीवुड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना शिवसेनेत प्रवेश देऊन शिवसेनेने महिला कार्यकर्त्यांचे अवमूल्यन केल्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केले आहे.

उर्मिला मातोंडकर यांनी मंगळवारी मातोश्री वर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी उर्मिला यांना शिवबंधन बांधून त्यांचे स्वागत केले. राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या जागेसाठी शिवसेनेकडून मातोंडकर यांच्या नावाचा प्रस्ताव आहे. पक्षात कुणाला प्रवेश द्यायचा हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. पण मातोंडकर यांच्या प्रवेशाने महिला आघाडी मजबूत होईल अशा प्रकारचे वक्तव्य करणे म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी रणरागिणी म्हणून ज्या शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांना उपमा दिली आणि ज्या रस्त्यावर आंदोलनात आघाडीवर असायच्या तसेच ज्या घरादाराची पर्वा न करता शिवसेनेच्या वाढीसाठी लढवय्या कार्यकर्त्या म्हणून काम केले त्यांच्या कामावर पाणी फेरण्याचा प्रकार असल्याचे दरेकर यांनी म्हटले आहे.

केवळ सत्तेच्या भोवती सेनेचे राजकारण- दरेकर

शिवसेना पक्षाची मूळ विचारधारा बदलली आहे. प्रियांका चतुर्वेदी यांना खासदार केले आहे. आज ज्या राज्यात काँग्रेस सत्तेत आहे. त्या काँग्रेसकडून लोकसभेची निवडणूक लढवलेल्या उमेदवाराला पक्षात प्रवेश दिला गेला आहे. त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत जाऊन केवळ सत्तेच्या समीकरणाभोवती शिवसेनेचे राजकारण फिरत असल्याचा आरोप दरेकर यांनी केला आहे.

You might also like