‘मुख्यमंत्री 6 महिन्यांनंतर घराबाहेर पडले ही ब्रेकिंग न्यूज असेल तर महाराष्ट्रासाठी दुसरं दुर्दैव काय !’ : भाजप आमदाराची टीका

बारामती : पोलीसनामा ऑनलाईन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यात अतिवृष्टी झालेल्या ठिकाणी पाहणी दौरा करण्यासाठी सोलापूरात पोहोचले आहेत. मात्र या दौऱ्यावरून विरोधी पक्ष भाजपने ठाकरेंवर टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांचा दौरा जाहीर झाल्यानंतर 6 महिन्यांनंतर मुख्यमंत्री घराबाहेर पडले ही ब्रेकिंग न्यूज होते. असं असेल तर महाराष्ट्रासाठी दुर्दैव दुसरं काही नाही अशा शब्दात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सीएम ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे.

आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, “प्रत्येक वेळेस केंद्र सरकारकडे बोट दाखवलं जातं. मदत करण्याची भूमिका केंद्र सरकारनं घेतली परंतु राज्य सरकारनं काय केलं हे सांगावं. अतिवृष्टी झाली केंद्र मदत करेल परंतु राज्यानं केंद्राकडे किती नुकसान झाला याचा आढावा तरी पाठवला पाहिजे. तहसिलदार पोहचत नाही. प्रशासन शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचत नाही. राज्य सरकारनं नुकसानीचा आढावा तरी घ्यायला हवा. केंद्र सरकारनं प्रत्येक वेळेस मदत केली. कोरोना काळातही मदत केली परंतु राज्य सरकारनं 1 योजना दाखवावी” असं आवाहन देखील त्यांनी ठाकरे सरकारला केलं.

पडळकर म्हणतात, “मुख्यमंत्र्यांचा दौरा जाहीर झाल्यानंतर 6 महिन्यांनंतर मुख्यमंत्री घराबाहेर पडले ही ब्रेकिंग न्यूज होते. असं असेल तर महाराष्ट्रासाठी दुर्दैव दुसरं काही नाही. शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडून कोणतीही अपेक्षा धरली नाही. निर्णय घेण्याची क्षमता नाही, कोणतीही अंमलबजावणी नाही. प्रत्येक अडचणीच्या काळात विरोधी पक्षनेते गावागावात पोहोचले आहेत. कोरोना, चक्रीवादळ, विदर्भ पूर प्रत्येक ठिकाणी देवेंद्र फडणवीस लोकांच्या मदतीसाठी पोहोचले आहेत” असंही पडळकर म्हणाले आहेत.