MPSC परीक्षेवरून गोपीचंद पडळकरांनी दिलाय सरकारला ‘हा’ इशारा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) ‘राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020’ची परीक्षा येत्या 14 मार्चला घेण्यात येणार होती. मात्र, कोरोना व्हायरसच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आयोगाने ही पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. आयोगाच्या या निर्णयावरून जोरदार विरोध केला जात आहे. त्यानंतर आता भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनीही प्रतिक्रिया देत निषेध केला आहे.

येत्या 14 मार्चला होणारी ‘राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020’ पुढे ढकलण्यात आली असल्याची माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रसिद्धिपत्रक जारी करून दिली. या निर्णयावरून पुन्हा एकदा संताप व्यक्त केला जात आहे. पुण्यातील नवी पेठेत विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरत सरकारच्या निर्णयाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. या आंदोलनात गोपीचंद पडळकर हे सहभागी झाले असून, सरकारचा निषेध केला आहे. जोपर्यंत सरकार परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय रद्द करत नाही, तोपर्यंत आम्ही येथून हटणार नाही, असा इशारा दिला आहे.

पीपीई किट घालून परीक्षा घ्या

गोपीचंद पडळकर हे या आंदोलनात सहभागी झाले. त्यामध्ये त्यांनी सरकारचा तीव्र शब्दांत निषेध केला. तसेच विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळू नये. विद्यार्थ्यांना पीपीई किट घालावी लागली तरी चालतील. मात्र, नियोजित परीक्षा झालीच पाहिजे, असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला आहे.

मराठा आरक्षणामुळे परीक्षा लांबणीवर

यापूर्वी 11 ऑक्टोबर 2020 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यसेवेची पूर्व परीक्षा घेतली जाणार होती. मात्र, त्यावेळी मराठा आरक्षण प्रश्नांबाबत महिला संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर आता कोरोनाचे कारण देत परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.