‘मनसेची भूमिका योग्य’ असं म्हणत गोपीचंद पडळकरांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा, म्हणाले- ‘जनता तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही’

सिंधुदुर्ग : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना वाढत आहे असं सांगून राज्याचं अधिवेशन टाळत असाल तर राज्यातील जनता पहात आहे, ती तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही असं म्हणत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. सध्या पडळकर कोकणच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी ते पत्रकरांसोबत बोलताना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्य सरकारवर निशाणा साधला.

गोपीचंद पडळकर म्हणाले, ठाकरे सरकारला कुठल्याच परिस्थितीचं गांभीर्य नाही. कोरोना काळात लॉकडाऊन झालं आणि त्यानंतर लॉकडाऊन उघडल्यानंतरही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला 100 अधिक पत्र पाठवली, त्यात कोरोना चाचणी थांबवू नका, ती जास्तीत जास्त वाढवा असं म्हटलं होतं. तेव्हा सरकारनं कानाडोळा केला. विरोधी पक्षनेत्यांचं ऐकलं नाही असा आरोप त्यांनी केला.

मनसेची भूमिका योग्य
मनसेनं राज्य सरकारवर आरोप केला होता की, अधिवेशन टाळण्यासाठी कोरोना वाढला आहे असं दाखवलं जात आहे. यावर बोलताना पडळकरांनी मनसेची भूमिका योग्य असल्याचं म्हटलं आहे. पडळकर म्हणाले, वाढीव वीजबिलानं राज्यातील जनता त्रस्त आहे. सरकारला जनतेशी काही देणंघेणं नाही. मनसेनं मांडलेली भूमिका योग्यच आहे. अधिवेशन पूर्ण वेळ झालं पाहिजे ही भाजपची भूमिका आहे. राज्यातील जनतेचे प्रश्न मांडणे आणि ते सोडवून घेणं ही विरोधी पक्षांची जबाबदारी आहे, परंतु अधिवेशन 2 दिवस घेणार असाल आणि कोरोना झाला म्हणून अधिवेशन टाळणार असाल तर हे सर्व जनता पहात आहे. यापुढं महाराष्ट्रातील जनता तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही.