भाजपा आ. पडळकरांना शरद पवारांवरील टीका महागात पडली, धनगर समितीनं दिला ‘दणका’

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरुन बोलताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरती आक्षेपार्ह भाषेत टीका केली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून पडळकर यांच्या विरोधात राज्यभर आंदोलन करण्यात आली. आता धनगर आरक्षण समितीतून गोपीचंद पडळकर यांना बाजूला करण्यात आलं आहे.

धनगर समाजाची आज सकाळी वेळापूर येथे बैठक पार पडली. त्या बैठकीमध्ये धनगर समाजातील नेत्यांनी सुद्धा आमदार पडळकर यांच्या वक्तव्याचा निषेध केला. तसेच त्यांना धनगर समाजाच्या कार्यक्रमांमध्ये बहिष्कार टाकण्याचा निर्णय धनगर आरक्षण लढ्याचे मुख्य प्रवर्तक उत्तम जानकर यांनी घेतला आहे. गोपीचंद पडळकर यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे धनगर समाजाची बदनामी झाली आहे. शिवाय आरक्षणाचा मुद्दा देखील बाजूला पडला आहे. म्हणून असे बेताल वक्तव्य करुन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या पडळकर यांना, यापुढे आरक्षण लढ्यात कुठे सुद्धा सहभागी करुन घेतले जाणार नसल्याचं यावेळी बोलताना जानकर यांनी स्पष्ट केलं.

पडळकरांविरुद्ध बारामतीत गुन्हा नोंद –

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने २५ जून रोजी शहर पोलिस स्टेशनला गोपीचंद पडळकर यांच्यावरती गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली होती. ‘जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत पोलिस स्टेशन बाहेर ठिय्या मांडणार’ अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली. अखेर पोलिसांकडून गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पडळकर यांच्यावर ५०५(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय बोलले होते गोपीचंद पडळकर –

शरद पवार यांच्याकडे कोणतीही विचारधारा, अजेंडा, व्हिजन नाही. छोट्या छोट्या समूह घटकांना भडकवायचं, त्यांना आपल्या बाजूला करायचं आणि त्यांच्यावरच अन्याय करण्याची त्यांची भूमिका आहे. धनगर आरक्षणाच्या बाबत ते सकारात्मक असतील असं मला वाटत नाही. त्यांना फक्त धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नाचं राजकारण करायचं आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं धनगरांसाठी पॅकेज जाहीर केलं होत. पण विश्वासघातामुळे सरकार पडल्यानं त्यावर कार्यवाही होऊ शकली नाही. मात्र, या सरकारनं त्या पॅकेजमधील एक रुपयादेखील दिला नाही. विधिमंडळाच्या अधिवेशनात आम्हाला यावरती बोलावं लागले, असं पडळकर म्हणाले. तर शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना असल्याचं वादग्रस्त विधान गोपीचंद पडळकर यांनी यावेळी बोलताना केलं होत.