‘दादा ! बहुजनांचे हक्क आणि अधिकार हे तुम्हाला बारामतीची जहागिरी वाटतात का ?’; …वसूली वाढवायची आहे का?’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  सरकारी नोकरीमध्ये असलेल्या पदोन्नतीमधील आरक्षण रद्द झाल्याच्या मुद्यावरुन भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली आहे. रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा फुले, आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज, राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना काळीमा फासण्याचे काम महाविकास आघाडी सरकारने केले आहे. आरक्षण इथल्या शोषित आणि मागासलेल्या समाजासाठी न्यायाचा आधार आहे. बहूजनांच्या हिताच्या बाबतीत सरकार सतत गळचेपीचं धोरण राबवत आहे. फुले-शाहू-आंबेडकरांचे नाव घेण्याचा कोणताही नैतिक अधिकार महाविकास आघाडीला आता राहिलेला नाही, अशा शब्दात पडळकर यांनी सरकारवर टीका केली आहे.

बारामतीची जहागिरी वाटते का ?

पडळकर यांनी यासंदर्भात अजित पवार यांना पत्र लिहले आहे. पडळकरांनी ट्विट करुन पत्र शेअर करताना दादा ! बहुजनांचे हक्क आणि अधिकार हे तुम्हाला बारामतीची जहागिरी वाटतात का ?’ कदाचित तुम्हाला काही खास अधिकाऱ्यांचीच सोय लावून वसूली वाढवायची आहे का ? असा प्रश्न जनतेला पडतोय. पदोन्नती बाबतचे तिन्ही जीआर त्वरीत रद्द करा, अन्यथा 25 मे पासून मंत्रालयासमोर ठिय्या आंदोलन करेन, असा इशारा गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे.

दादा, पदाचे भान ठेवा

दादा ! तुमचा पक्ष आपल्याच पई पाव्हण्यांचा आणि त्यांच्याच हिताचा विचार करणारा आहे. त्याविषयी माझी काही तक्रार नाही, पण तुम्ही आता महत्त्वाच्या वैधानिक पदावर आहात ह्याचे भान ठेवावे व सर्वसमावेशक निर्णय घेतले पाहिजेत. मात्र दुर्दैवाने असं घडत नाहीये. म्हणून मला तुमचे लक्ष्य आपण आता नव्याने काढलेल्या पदोन्नती बाबतच्या 7 मे 2021 च्या शासन निर्णयाकडे (GR) वेधायचे आहे, असे पडळकर यांनी पत्रात म्हटले आहे.