भाजप आमदाराचा कोरोनाने मृत्यू, मुलाकडून योगी सरकारचे वाभाडे, म्हणाले – ‘धन्य ते यूपी सरकार, धन्य ते मोदीजी’

लखनऊ: पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसागणिक रुग्णसंख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. अशातच भाजपा आमदार केसर सिंह गंगवार यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे सत्ताधारी पक्षाच्या आमदाराला 24 तास ICU बेड मिळाला नसल्याचे समोर आले आहे. आता त्यांच्या मृत्यूनंतर त्यांनी रुग्णालयात असताना केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांना लिहिलेल पत्र व्हायरल झाले आहे. त्यात आपल्याला बेड मिळावा, अशी मागणी त्यांनी केली होती. या आमदारांनी 18 एप्रिलला त्यांनी हे पत्र लिहले होते.

आमदार गंगवार यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा विशालने एक फेसबुक पोस्ट लिहून सरकारबद्दल रोष व्यक्त केला. हेच का उत्तर प्रदेश सरकार? त्यांना आपल्याच आमदारावर उपचार करता येत नाहीत. मी अनेकवेळा सीएम कार्यालयाला फोन केले. पण कुणीही फोन उचलला नाही. धन्य ते यूपी सरकार, धन्य ते मोदीजी अशा शब्दांत त्याने सरकारबद्दल संताप व्यक्त केला. त्यांच्या फेसबुक पोस्टची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. 18 एप्रिलला आमदार गंगवार यांना कोरोनाची बाधा झाली होती. सुरुवातीला त्यांना बरेली येथील हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. पण, त्यांना 24 तासांपर्यंत आयसीयू बेड मिळाला नाही. काही दिवसांपूर्वीच त्यांना नोएडातील रुग्णालयात दाखल केले होते. तिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.