भाजपा नेत्याचं वादग्रस्त विधान, म्हणाले – ‘राकेश टिकैत हे 2 हजार रूपयांसाठी कुठेही जायला तयार होतात’ (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राजधानी दिल्ली येथे गेले दोन महिन्यापासून केंद्रीय कृषी कायद्याविरोधी शेतकरी आंदोलन सुरू आहे. तर शेतकरी आंदोलनाचं नेतृत्त्व करणारे भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत हे त्या आंदोलनात शेतकऱ्यांसोबत ठाण मांडून आहेत. या दरम्यान गाझियाबादचे भाजपचे आमदार नंद किशोर गुर्जर यांनी शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्याबाबत एक वादग्रस्त विधान केलं आहे. आमदार गुर्जर बोलताना म्हणाले, राकेश टिकैत हे फक्त दोन हजार रुपयांसाठी कुठेही जायला तयार होतात, असं त्यांनी म्हटलं आहे. रात्र आमदार गुर्जर यांच्या या विधानामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.

या दरम्यान, राकेश टिकैत यांनी आमदार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर गाझीपूर सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना धमकावल्याचा आरोप केला आहे. तर भाजपचे आमदार नंद किशोर गुर्जर म्हणाले, मी टिकैत कुटुंबाचा आदर करतो. मात्र लोकं असं म्हणतात की, राकेश टिकैत हे दोन हजार रुपयांसाठी कुठेही जायला तयार होतात. असं असल्यास ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट असून त्यांनी असं करू नये, तसेच आपण स्वत:ही शेतकरी आहे. राकेश टिकैत यांनी शेतकऱ्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करू नये. असे भाजपाच्या नंद किशोर गुर्जर यांनी म्हटले आहे.

शेतकऱ्यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी हरियाणातील जिंद येथे आज शेतकरी महापंचायतीचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमासाठी आसपासच्या गावातून मोठ्या प्रमाणावर शेतकरी गोळा झाले होते. राकेश टिकैत हे मंचावर बोलण्यासाठी उभे राहिले. मात्र त्याचवेळी अचानक मंच कोसळला आणि थोडा गोंधळ निर्माण झाला. काही वेळातच मंच व्यवस्थित केल्यानंतर ते पुन्हा मंचावर आले आणि भाग्यवान लोकांचेच व्यासपीठ तुटतात असं म्हणत टिकैत यांनी भाषणाला जोरदार सुरुवात केली. “जेव्हा-जेव्हा राजा घाबरतो, तेव्हा-तेव्हा तटबंदी तयार करत असतो. दिल्लीत खिळे ठोकले जात आहेत” असं देखील राकेश टिकैत यांनी म्हटलं आहे.