‘अश्लील’ मेसेज पाठवल्या प्रकरणी भाजप आमदारासह तिघांवर FIR

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – जुन्या कौटुंबिक वादाचा राग मनात धरून एका तरुणीच्या मदतीने आपल्याच भाच्याला अश्लिल मेसेज पाठवून त्रास दिल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणी बदनापूरचे आमदार नारायण कुचे यांचा भाऊ देविदास कुचे आणि अश्लील संदेश पाठवणाऱ्या तरुणीविरोधात जालना जिल्ह्यातील चंदनझिरा पोलिसात न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणी पीडित भाच्याने चंदनझिरा पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र पोलिसांनी दखल न घेतल्याने भाच्याने औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. तेव्हा सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती तानाजी व्ही नलावडे व न्यायमूर्ती श्रीकांत डी. कुलकर्णी यांच्या खंडपीठाने संबंधित भाचा दीपक डोंगरे यांच्या 2 मार्च रोजीच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करून घेण्याचे आदेश पोलिसांना दिले.

डोंगरे हे व्यावसायानिमित्त सख्खे मामा आमदार नारायण कुटे यांच्याकडे राहण्यास होते. डोंगरेंनी कुचे यांना 40 लाख रुपये निवडणुकीसाठी दिल्याचे म्हटले आहे. दरम्यान, कुचे परिवाराने त्यांच्या मुलीशी डोंगरे यांचा विवाह लावून देण्याचा प्रस्ताव ठेवला होता. तो डोंगरेंसह त्यांच्या नातेवाईकांना मान्य होता. यातून कुचे परिवारातील मुलीशी डोंगरे यांचे प्रेम जुळले. डोंगरे याने कुचे यांच्याकडे पैशांची मागणी केली असता, आमदार नारायण कुचे यांना प्रेम प्रकरणाबाबत समजले. याचा राग आनावर होऊन त्यांनी कंत्राटाचे प्रमाणपत्र रद्द करून काळ्या यादीत टाकतो, काटा काढतो अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. तसेच आमदार कुटे यांच्यासह त्यांचे बंधू देविदास कुचे यांनी आपणाविरोधात षडयंत्र रचून एका तरुणीस आपणास अश्लील संदेश पाठविण्यास सांगत जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केल्याचेही तक्रारीत नमूद केले आहे.

सुनावणी दरम्यान तरुणीचा जबाब याचिकाकर्त्यांतर्फे रवींद्र गोरे यांच्यातर्फे खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिला. सुनावणीअंती डोंगरे यांनी 2 मार्च रोजी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. खंडपीठाच्या आदेशानुसार आमदार नारायण कुचे, त्यांचे बंधू देविदास कुचे व संबंधित तरूणीविरुद्ध चंदनझिरा पोलीस ठाण्यात भादंवी कलम 294,507,34 आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम 67 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचिकाकर्त्यातर्फे रवींद्र गोरे यांनी काम पाहिले. चंद्रकांत बोडखे यांनी सहाय्य केले. तरुणीचा जबाबानुसार देविदास कुचे यांच्या सांगण्यावरून आपण डोंगरे यांना प्रेमाचे संदेश पाठविल्याचे सांगितले. यानंतरही पोलिसांनी या तक्रारीची दखल घेतली नसल्याने डोंगरे यांनी खंडपीठात धाव घेतली होती. अखेर पोलिसांनी खंडपीठाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल केला आहे.