पोलीस भरती : मराठा समाजाच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम करताय का ?, भाजप आमदाराचा सरकारला सवाल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात सर्वात मोठी पोलीस भरती करण्याचा निर्णय राज्य सरकारने बुधवारी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेतला. मात्र, मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली असताना सरकारने मेगा पोलीस भरती करण्याच्या निर्णयाला राज्यातील मराठा नेत्यांनी विरोध करण्यास सुरुवात केली. आहे. सरकारच्या या निर्णयाबाबत मराठा समाजातून देखील संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.

याबाबत भाजपचे आमदार नितेश राणे यांनी सरकारच्या या निर्णयावर घणाघाती टीका केली आहे. नितेश राणे यांनी ट्विट करत सरकारवर निशाणा साधला आहे. राज्यात इतिहासातील सर्वात मोठी पोलीस मेगा भरती मराठा आरक्षण स्थगित झाल्यावर का ? जो पर्यंत मराठा आरक्षण परत लागू होत नाही तोपर्यंत मेगा भरती कशाला ? आगीत तेल टाकत आहात, जखमेवर मीठ चोळण्याचे काम हे महाराष्ट्र सरकार करत आहे का ? असा संतप्त सवाल राणे यांनी राज्य सरकारला विचारला आहे.

छत्रपती संभाजीराजेंचाही सरकारला इशारा
महाविकास आघाडीने 12 हजार 500 जागांच्या पोलीस भरतीचा घेतलेला निर्णय हा मूर्खपणाचा आहे, अशा शब्दात राज्यसभा सदस्य छत्रपती संभाजीराजे यांनी महाराष्ट्र सरकारवर टीका केली आहे. ठाकरे सरकारच्या या निर्णयामुळे राज्यात मराठा समाजही पेटून उठला आहे. अनेक ठिकाणी आज आक्रमक आंदोलनाला सुरुवात झाली आहे. मराठा आरक्षणाची सध्या लढाई सुरु आहे आणि त्यातच राज्यात कोरोनाचा प्रकोप आहे. अशावेळी पोलीस भरती करणे कितपत योग्य आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

तरी जर सरकारने ठरवलं पोलीस भरती करायची आहे ते करु शकतात पण यामुळे मराठा समाजात आक्रोश निर्माण होईल. सगळ्यांना सुखानं रहायचं असेल तर वातावरण गढूळ करु नका, मराठा समाजातल्या मुलांनी काय करायचं ? नोकर भरतीला विरोध नाही पण टायमिंग चुकीचं आहे. अध्यादेश काढा पण आरक्षण द्या असा इशारा संभाजीराजेंनी राज्य सरकारला दिला आहे.