‘सरकार नाही सर्कस आहे’, नितेश राणेंची खरमरीत टीका

पोलिसनामा ऑनलाईन – पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्यांचा आदेश रद्द करण्यात आल्यानंतर महाविकास आघाडी सरकारमध्ये मतभेद असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर भाजप आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकारवर जोरदार टीका केली आहे.

’नगरविकास मंत्रालयातील बदल्या नव्हे तर फेरफार (आघाडी सरकारच्या भाषेत ) मंत्र्यांच्या संमतीशिवाय? पोलीस उपायुक्तांच्या बदल्या झाल्यावर गृहमंत्र्यांना कळते? मात्र काँग्रेसचे महसूल आणि पीडब्ल्यूडी मंत्र्यांना बदल्या करण्यास मनाई? हे खरंच सरकार नाही सर्कस आहे,’ असे म्हणत नितेश राणे यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्रालयाने केलेल्या 10 पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या रद्द केल्या आहेत. काही दिवसांपूर्वी या अधिकार्‍यांच्या बदल्या करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र त्यानंतर तीनच दिवसांनी मुख्यमंत्र्यांनी या सर्व बदल्या रद्द केल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या बदल्या करताना गृहविभागाकडून मुख्यमंत्र्यांशी सल्लामसलत करण्यात आली नव्हती अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. यातून उद्धव ठाकरेंनी आपली पॉवर दाखवली असून राष्ट्रवादीला धोबीपछाड दिला अशी चर्चा आहे.