शरद पवारांनी फटकारल्यानंतर भाजपाचे ‘हे’ आमदार म्हणतात – ‘पार्थ…थांबू नकोस मित्रा !’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेत सुशांतच्या मृत्यू प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. यावर शरद पवार यांना विचारण्यात आले असता त्यांनी सांगितले की, नातवाच्या बोलण्याला कवडीचीही किंमत देत नाही, ते अपरिपक्व असल्याचे म्हणत फटकारले. याच दरम्यान भाजपा आमदार नितेश राणे यांनी एक उपहासात्मक ट्विट केले आहे. पार्थ पवार लंबी रेस का घोडा असल्याचे त्यांनी आपल्या ट्विटमध्य म्हटले आहे.

नितेश राणे यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, आज परत सांगतो… पार्थ… लंबी रेस का घोडा है !!! थांबू नकोस मित्रा. नितेश राणे यांनी ट्विटमध्ये इतर कोणताही संदर्भ दिलेला नाही. मात्र, शरद पवारांनी पार्थ पवार यांच्या बद्दल केलेल्या वक्तव्यानंतर काही वेळातच त्यांनी हे ट्विट केले आहे.

काय म्हणाले शरद पवार
यशवंतराव चव्हाण सेंटर येथे शरद पवार आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवार बोलत होते. पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेत सुशांतच्या मृत्यू प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. यावर शरद पवार यांना विचारण्यात आले असता त्यांनी सांगितले की, नातवाच्या बोलण्याला कवडीचीही किंमत देत नाही, ते अपरिपक्व आहेत.

सीबीआयबाबत ते बोलले आहेत तर मी म्हणेन, महाराष्ट्र पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे. पण जर कोणी म्हणत असेल, अन्य चौकशीबाबत, तर त्याला विरोध असण्याचे कारण नाही, असे शरद पवार म्हणाले. याचबरोबर मी महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलिसांना 50 वर्षे ओळखतो. माझा महाराष्ट्र पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे. चौकशी करायची असेल, सीबीआय किंवा कोणतीही एजन्सी वापरायची असेल, तर मी विरोध करणार नाही, असे पवार यांनी सांगितले.