भाजपाच्या आमदारांसह पंढरपूर मंदिर समितीच्या सदस्यावर FIR दाखल

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन – संचारबंदी, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन, अधिनियमाचे साथी रोग प्रतिबंधक अधिनियमाचे उल्लंघन केल्याप्रणी सोलापूर जिल्ह्यात सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे. राज्यात संचारबंदी आणि लॉकडाऊन असताना भाजपचे आमदाराने पंढरपूमध्ये विठ्ठलाची पूजा केली. कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी विठ्ठल-रुक्मीणी मंदिर समितीचे सदस्य तथा भाजपचे आमदार सुजितसिंह ठाकूर व शिवसेनेच्या कोट्यातून मंदिर समितीचे सदस्य झालेले संभाजी शिंदे यांच्यावर पंढरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, देशात आणि राज्यात संचारबंदी लागू आहे. श्री विठ्ठल रुग्मिणी मातेचे दर्शन भाविकांसाठी बंद करण्यात आले आहे. असे असतानाही कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात न घेता भाजप आमदार सुजितसिंह ठाकूर (रा. उस्मानाबाद) व त्यांच्या पत्नी, श्री विठ्ठल-रुक्मीणी मंदिर समितीचे संभाजी शिंदे व त्यांच्या पत्नी यांनी चैत्र यात्रेनिमित्त सकाळी साडेचार ते साडेपाच वाजण्याच्या सुमारास विठ्ठल रुक्मिणीची पूजा-अर्चा केली.

मंदीरात एकत्र जमून कोरोना विषाणूचा संसर्ग फैलवण्याचा धोका आहे याची जाणीव असताना देखील विठ्ठल रुक्मीणीची पूजाअर्चा केली. यामुळे या सर्वांवर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, महाराष्ट्र पोलीस कायदा तसेच साथीचे रोग प्रतिबंधक अधिनियमाच्या कलमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल बालाजी कदम यांनी पंढरपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.