मध्यवर्ती बँकेच्या कारभारावरून आजी-माजी आमदारांमध्ये जुंपली

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – सहकार क्षेत्रात शासनाने दिलेल्या नियमानुसार व्यवहार केले जात असताना मात्र, अमरावती जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये अंधाधुंदी कारभार सुरु असल्याचा आरोप भाजपचे आमदार प्रताप अडसर यांनी केला आहे. त्याच्या आरोपाला माजी आमदार आणि बँकेचे संचालक वीरेंद्र जगताप यांनी प्रत्युत्तर दिले आहे. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना दोन आजी-माजी आमदारांमध्ये चांगलीच जुंपली आहे.

जिल्हा मध्यवर्ती बँकेची 2015 मध्ये मुदत संपली आहे. पाच वर्षे संचालकांची मुदत असताना निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली नाही. संचालक मंडळ नियमाला डावलून कामे करत असल्याने शेतकऱ्यांना वेळेत कर्जपुरवठा होत नाही. संचालक मनमर्जी राजकारण करत आहे. कोरोना काळात खर्च न करण्याचा शासनाचा निर्णय असताना सॉफ्टवेअर करिता निविदा मागवण्यात आल्या. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जपुरवठा केला गेला नसल्याचा आरोप आमदार प्रताप अडसर यांनी केला आहे. विशेष म्हणजे प्रताप अडसर यांच्यासह कुटुंबातील दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. ते स्वत: न्यायालयातून जामिनावर बाहेर आहेत.

आमदार प्रताप अडसर यांच्या आरोपांना माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की, आमच्यावर एकही गुन्हा नाही. केंद्रात भाजपचे सरकार असून त्यांनी आमच्या बँकेवर ईडीची चौकशी करावी आम्ही पूर्ण चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहोत, पण त्यांनी सुडाचे राजकारण करू नये, असे सांगत जगताप यांनी संपूर्ण आरोपांचे खंडन केले आहे. तसेच अडसर यांच्या कुटुंबीयावर सूत गिरणी बुडवल्याचे आरोप आहेत. चेक बाऊन्स प्रकरणी गुन्हे दाखल आहेत. सुडबुद्धीने आमच्यावर आरोप केले जात आहे. आम्ही जर भ्रष्टाचार केला असेल तर केंद्र सरकारने न्यायालयीन चौकशी करावी असेही जगताप यांनी म्हटले आहे.