…म्हणून भाजप आमदारालाच ‘देशद्रोहा’चा गुन्हा दाखल होण्याची भीती

लखनौ : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेश राज्यातील भाजपचे आमदार असलेले राकेश राठोड यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. त्यांनी स्वतःच्याच सरकारवर टीका करत म्हटले, मी अनेक पावले उचलली परंतु, लोकप्रतिनिधींची लायकीच काय आहे? जर मी अधिक बोललो तर माझ्यावरच देशद्रोहाचा गुन्हा दाखल होईल, असे विधान आमदार राकेश राठोड यांनी केले आहे.

उत्तर प्रदेश राज्यात भाजपची सत्ता आहे. तर राकेश राठोड हे पहिल्यांदाच आमदार झाले आहेत. त्यांनी २०१७ च्या निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. राठोड यांना सीतापूर येथील सरकारी ट्रॉमा सेंटर कार्यान्वित करण्याबाबत काय प्रयत्न सुरु आहेत हा प्रश्न केला असता तेव्हा त्यांनी हे भाष्य केले आहे. तसेच, तुमच्याच सरकारमध्ये आमदार म्हणून तुमच्या भागाचे प्रतिनिधीत्व करु शकत नाही असे आपल्याला म्हणायचे आहे का? असे माध्यमांकडून विचारण्यात आल्यानंतर राठोड म्हणाले, तुम्हाला वाटते का की आमदार आपले मत मांडू शकतात? तुम्हाला माहीत आहे की मी याआधीही या विषयावर आवाज उठवला होता. अशी प्रतिक्रिया आमदार आमदार राठोड यांनी दिलीय.

या दरम्यान, मागील वर्षी राज्यातील भाजप नेतृत्वाने त्यांची कथित पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करणारी ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्यानंतर स्पष्टीकरण मागवले होते. या क्लीपमध्ये राठोड दुसऱ्या भाजप आमदाराशी बोलत असताना पंतप्रधान मोदींनी लोकांना कोरोनाच्या महामारीत घंटा आणि थाळ्या वाजवण्यास सांगणे पूर्णपणे चुकीचे असल्याचे सांगत होते. तुम्ही टाळ्या वाजवून कोरोना घालवणार आहात का? तुम्ही वेडेपणाचे रेकॉर्ड मोडत आहात. शंख वाजवल्याने कोरोना जाणार आहे का? तुमच्यासारखे लोक वेडे आहेत. ते तुमचा नोकरी धंदा काढून घेतील. असे वक्तव्य त्यावेळी आमदार राकेश राठोड यांनी केले होते.