वेबसिरीजमुळं ‘तांडव’, पोलिसांनी आ. राम कदम यांना घेतलं ताब्यात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – तांडव या वेबसीरिज विरोधात भाजपचे आमदार राम कदम यांनी ठिय्या आंदोलन सुरु केले होते. यावेळी उपस्थितांनी सरकार विरोधी घोषणाही दिल्या. या प्रकरणी घाटकोपर येथील चिराग नगर पोलिसांनी राम कदम आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.

तांडव वेबसिरिजच्या निर्मात्या विरोधात मुंबई पोलीस कारवाई करण्यास तयार आहेत. मात्र, राज्य सरकार त्यांना रोखत आहेत, असा दावा राम कदम यांनी यावेळी केला. महाविकास आघाडी सरकार हिंदू विरोधी आहे. संतांच्या भूमीतच संतांचा अपमान होत आहे, असा आरोप राम कदम यांनी यावेळी केला. तांडव वेबसिरिजमध्ये हिंदू देवतांचा अपमान झाल्याबाबत अनेक तक्रारी आल्या आहेत. मात्र, निर्मात्या विरोधात अद्याप एफआयआर दाखल करण्यात आलेला नाही. महाविकास आघाडी सरकार पोलिसांवर दबाव टाकत असल्याचा आरोप कदम यांनी केला आहे.

राम कदम यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे की, आमचा आवाज दाबण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मला व काही राम भक्तांना ताब्यात घेतलं. अजून किती जणांचा आवाज दाबणार आहात ? ज्यांनी हिंदू देवी देवतांचा अपमान केला ते एसीमध्ये बंगल्यात आहेत आणि न्यायाची मागणी करणारे तुरुंगात, असं ट्विट राम कदम यांनी केलं आहे.

काय आहे वाद ?
तांडव वेबसिरिजच्या सोशल मीडियावर सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. अभिनेता झिशान आयुब याच्यावर चित्रीत एका दृष्यावर काहींनी तीव्र आक्षेप घेतला आहे. या दृष्यांमुळं हिंदू देवी-देवतांचा अपमान झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. तसंच, निर्मात्यांनी माफी मागावी अशी मागणीही जोर धरु लागली आहे.

तांडवच्या दिग्दर्शकांची माफी
तांडव वेबसिरीज पूर्णपणे काल्पनिक आहे. यामधील घटनेचा कोणत्याही जिवीत व्यक्ती वा एखाद्या घटनेशी संबंध नाही. असला तर तो योगायोग समजावा. कोणत्याही व्यक्ती, जाती, समुदाय आणि धार्मिक भावनांना दुखावण्याचा आमचा हेतू नाही. आम्ही सर्व तक्रारी समजून घेतल्या असून, कुणाच्या भावना दुखावल्या असल्यास आम्ही सर्वांची कोणत्याही अटीविना माफी मागतो, असे तांडव वेबसिरीजचे दिग्दर्शक अली अब्बास जाफर यांनी म्हटले आहे.