महिलादिनानिमित्त दिलेल्या शुभेच्छा कॉपी पेस्ट, राम कदम सोशल मीडियावर ट्रोल 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आज ८ मार्च जागतिक महिला दिन , त्यामुळे सर्वांनी महिलांना शुभेच्छा दिल्या आहेत. पूर्वी महिलांबाबत अक्षेपार्ह वक्तव्य करणारे भाजपाचे आमदार राम कदम यांनीही महिलांना ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या आहे. मात्र महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या कदम यांचा नेटकऱ्यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. शिवाय त्यांनी दिलेल्या शुभेच्छा कॉपी पेस्ट आहेत, असा आरोपही नेटकऱ्यांनी केली आहे.

सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी महिला दिनानिमित्त त्यांच्या ट्विटरद्वारे जो संदेश दिला आहे तोच संदेश कदम यांनी लिहिला आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी ‘केवळ ट्विट कॉपी पेस्ट करून कुणी सद्गुरू होत नाही, त्यासाठी शुद्ध मानसिकता लागते’ अशा कमेंटस दिल्या आहेत.

‘मुलींच्या निर्णयाची जराही किंमत न करणा-या राम कदम यांना महिला दिनानिमित्त शुभेच्छा’, ‘निव्वळ ढोंगीपणा’ अशा रिप्लायचा पाऊस पडला आहे. हे वाचुन मला सितामाईला पळवायला साधुच्या वेषात आलेल्या रावणाचीच आठवण आली… तुमच्या उक्ती आणि कृतीत काही “राम” राहीला नाही आता.., असंही एकाने ट्वीट केले आहे.

दरम्यान, घाटकोपर येथे दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले होते. त्यावळे राम कदम यांनी महिलांसंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. यानंतर कदम यांच्यावर सर्व स्तरातून कडाडून टीका झाली होती. राजकीय वर्तुळ, सोशल माध्यमातून व्यक्त होणारी नाराजी पाहता कदम यांना अखेर त्यांच्या वक्तव्याबाबत माफी मागावी लागली होती. त्यानंतर पुन्हा एकदा राम कदम यांनी केलेल्या ट्वीटवरून ते ट्रोल होत आहे.