भाजपा आमदाराचा अजित पवारांवर हल्लाबोल, म्हणाले – ‘कोरोना लसीसाठी पैसे नाही म्हणणाऱ्यांचा सोशल मीडियावर 6 कोटी खर्च कसा?’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. असे असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सोशल मीडियावर तब्बल 6 कोटींचा खर्च केल्याचे समोर आले आहे. यावरून भाजप आमदार राम कदम यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. कोरोना लसीसाठी पैसे नाही म्हणणारे महावसुली सरकार सोशल मीडियासाठी 6 कोटी रुपये खर्च करायला निघाले आहे, अशा शब्दात टीका केली आहे. उपमुख्यमंत्र्यांसाठी 6 कोटी, तर अशा डझनभर मंत्र्यांसाठी किती पैसे खर्च केले जाणार आहेत. लोकांच्या घामाचा पैसा स्वतःची वाहवा करण्यासाठी वापरला जाणार आहे. या सरकारची प्राथमिकता काय आहे? असा सवाल कदम यांनी विचारला आहे.

कोरोनामुळे उत्पन्नाचे स्रोत आटून राज्य सरकारला आर्थिक चणचण जाणवत आहे. तिजोरी रिकामी असल्यामुळे गेल्या वर्षीपासून राज्य सरकारने अनेक खर्चांना कात्री लावली आहे. त्यामुळे अनेक विकासकामे आणि उपक्रम अनिश्चित कालावधीसाठी रखडले आहेत. असे असातना दुसरीकडे त्याच राज्य सरकारने उपमुख्यमंत्री पवार यांच्या सोशल मीडियावर तब्बल 6 कोटीची उधळपट्टी केल्याचे आमदार कदम यांनी म्हटले आहे.

दरम्यान उपमुख्यमंत्र्याच्या सोशल मीडियासाठी जाहिरात काढली आहे. सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भातील आदेश जारी केले. आदेशात पवार यांची सोशल मीडियावरील खाती सांभाळण्यासाठी आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एखादी कंपनी नियुक्त केली जाणार आहे. ही कंपनी पवार यांचे ट्विटर, फेसबुक, ब्लॉगर, यूट्युब आणि इन्स्टाग्राम खात्याचे काम पाहील. तसेच व्हॉटसएप बुलेटिन, टेलिग्राम आणि एसएमएस पाठवण्याची जबाबदारीही कंपनीवर राहणार आहे. पवार यांचे सचिव आणि सामान्य माहिती व जनसंपर्क विभागाशी बोलणी झाल्यानंतर या नव्या कंपनीकडे सर्व कारभार दिला दिला जाणार आहे.