भाजप आमदाराच्या मुलाने लगावली पोलीस अधिकाऱ्याच्या कानाखाली

झाशी (उत्तर प्रदेश): वृत्तसंस्था – भाजप आमदार जवाहर राजपूत यांच्या मुलाने पोलीस अधिकाऱ्याच्या कानाखाली लगावल्याची घटना झाशी येथे घडली. पोलिसांनी राहुल राजपूतला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राहुल राजपुत हा नंबर नसलेल्या गाडीने जात होता. गुरसराई भागातील मोदी चौकात पोलिसांनी चौकशीसाठी गाडी थांबवली. नियमित तपासणीचा भाग म्हणून त्यांच्याकडे वाहनाची कागदपत्रांची मागणी केली. त्यावेळी राहुल याने मी आमदाराचा मुलगा आहे. त्यामुळे हे प्रकरण महागात पडेल अशी धमकी देत त्याने पोलीस अधिकाऱ्याच्या कानाखाली लगावली.

पोलिसांनी राहुलला ताब्यात घेतले. या घटनेची माहिती समजताच आमदार जवाहर राजपूत यांच्या समर्थकांसह पोलीस ठाण्यात पोहोचले. पोलिसांनी राहुल यांना मारहाण केल्याचा आरोप केला. माझ्या मुलाला त्रास देणाऱ्या पोलिसांविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांच्याकडे या प्रकरणाचा तपास सोपवण्यात आला आहे. हा प्रकार नेमका कशामुळे घडला याची चौकशी ते करत आहेत, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधीक्षकांनी दिली.