Video : भाजपा आमदाराचा भलताच दावा, म्हणाले – ‘फक्त आणि फक्त गोमूत्र प्यायल्यानेच कोरोनाला हरवता येईल’, व्हिडीओ व्हायरल

पोलीसनामा ऑनलाइन टीम – कोरोनावरील उपायासंदर्भात अनेक जण दावे करत आहेत. मात्र, त्यातून अद्यापर्यंत कोणालाही पूर्ण यश मिळाले नाही. त्यातच भाजपच्या अनेक नेतेमंडळीकडून रोज काही ना काही तरी दावे केले जात आहेतच. भाजपचे बुलंदशहरमधील आमदार देवेंद्र सिंह लोधी यांनी काही दिवसांपूर्वीच गोमूत्र प्यायल्याने कॅन्सर आणि कोरोनासारखे आजार होणार नाहीत. तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढते असा दावा केला होता. त्यावरून वातावरण अजून गरम असतानाच आता उत्तर प्रदेशच्या बैरिया विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार सुरेंद्रसिंह यांनी गोमूत्र प्यायल्यानेच कोरोनाला हरवता येणं शक्य आहे असा दावा केला आहे. विशेष म्हणजे याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून सर्व स्तरातून टीका होऊ लागली आहे.

कोरोनाविरुद्ध संपूर्ण जग लढत आहे. या लढ्याला लसीकरणामुळे पाठबळ मिळाले असले तरीदेखील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आणि मृत्यूचे वाढते प्रमाण हे सर्वांसाठी चिंतेची बाब आहे. कोरोनावर गोमूत्र हाच पर्याय ठरू शकतो, असा दावा सुरेंद्रसिंह करत असल्याचे या व्हिडीओत दिसत आहे. तसेच सुरेंद्रसिंह स्वत: गोमूत्र पिताना दिसत असून गोमूत्र कसे प्यायले पाहिजे हे देखील ते सांगत आहेत. कोरोनाला गोमूत्रच नियंत्रणात आणू शकेल असा दावाही त्यांनी केला आहे. केवळ कोरोनाच नाही तर इतर आजारांवरही गोमूत्र गुणकारी असल्याचे सुरेंद्रसिंह यांनी व्हीडिओत म्हंटले आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या देवेंद्र सिंह लोधी यांच्या व्हीडिओवरून काँग्रेसचे नेते राजीव शुक्ला यांनी टीका केली होती. शुक्ला यांनी  हा व्हिडिओ ट्वीट करून हे सर्व अद्यापही सुरु असून कुणीतरी यांना शांत राहण्यास सांगितलं पाहिजे असे म्हंटले होते. अशा वक्तव्यांची भाजप आमदारांना सवय झाली आहे. पंरतु, यामुळे लाेकांमधील रोष वाढतो आहे. गोमूत्राच्या विरोधात कोणीही नाही. पण डॉक्टर असल्याचे सारखे कोरोनावर उपाय सांगून गोमातेला यामध्ये आणू नये असे म्हंटले हाेते. मात्र, आता पुन्हा भाजपचे आमदार सुरेंद्रसिंह यांनी तशाच प्रकारचा दावा केल्याने हा मुद्दा चर्चेत आला आहे.