उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत भाजप आमदाराने ट्विट केला पर्रीकरांचा ‘तो’ फोटो अन् म्हटले…

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात कोरोना व्हायरसने अक्षरश: थैमान घातले आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी राज्यभरात अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत. मात्र, ही रुग्णसंख्या अपेक्षित अशी कमी होताना दिसत नाही. तर दुसरीकडे कोरोनाच्या परिस्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ‘मातोश्री’ निवासस्थान किंवा ‘वर्षा’ बंगल्यावरून कामकाज पाहत आहेत. यावरूनच भाजप आमदाराने मनोहर पर्रीकरांचा फोटो ट्विट करत मुख्यमंत्र्यांवर अप्रत्यक्ष टीका केली आहे.

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुळे परिस्थिती बिघडत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेवर याचा मोठा ताण येत आहे. मात्र, मुख्यमंत्री ठाकरे हे ‘मातोश्री’ निवासस्थान किंवा ‘वर्षा’ बंगल्यावरून कामकाज पाहत आहेत. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत आहेत. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून नेते व अधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहेत. त्यावरून जळगावचे भाजप आमदार सुरेश भोळे यांनी गोव्याचे मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचा फोटो ट्विट करत निशाणा साधला आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले, की ‘डोळे भरून येणारच…प्रकृती नाजूक असताना देखील काम करायचं असतं, प्रजेसाठीच मुख्यमंत्री असतो हे समजून घ्यायचं असतं !…घरी बसून प्रकृती सांभाळणारा मुख्यमंत्री जनतेला नको असतो…आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत काम करणारा एक समाजसेवी मुख्यमंत्री श्री स्व.मनोहरजी पर्रीकर…’

दरम्यान, भाजपचे राज्यसभा खासदार नारायण राणे आणि नितेश राणे व निलेश राणे हे दोन्ही पुत्र सातत्याने मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत असतात. त्यानंतर आता आमदार भोळे यांनीही मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले आहे.

आव्हाडांकडून कविता

भाजपकडून मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर टीका केली जात असली तरी राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी नुकतेच एका कवितेच्या माध्यमातून मुख्यमंत्री ठाकरे यांच्या कार्याची प्रशंसा केली होती. घरातील काही सदस्य कोविडशी झुंजत असताना मुख्यमंत्री धीरोदत्तपणे परिस्थितीला सामोरे जात आहेत, असे आव्हाड यांनी म्हटले होते.