भाजप आमदाराच्या पजेरोने दुचाकीला उडवले, तिघांचा मृत्यू

बलदेवगड : वृत्तसंस्था – खरगपूरचे भाजपचे आमदार राहुल सिंह लोधी यांच्या पजेरो गाडीने बलदेवगड मार्गावरील पपावनी गावाजवळ एका दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा झाशी येथील रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी घडली असून घटनेनंतर संतप्त जमावाने टीकमगढ-बलदेवगढ रस्ता चार तासांसाठी रोखून धरला होता.

ब्रजेंद्र अहिरवार (वय-28) रवि अहिरवार (वय-27) आणि मदन अहिरवार (वय- 19) असे मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. हे तिघे टीकमगढून बलदेवगढाकडे जात असताना हा अपघात झाला. अपघाताच्यावेळी आमदारांच्या गाडीने त्यांना मागून धडक दिली. रवीचे काका अच्छेलाल यांनी आरोप केला आहे की अपघाताच्यावेळी आमदार राहुलच कार चालवत होते.

अपघातानंतर संतप्त जमावाने राहुल सिंह लोधी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत रस्ता रोको केला. मात्र, प्रशासनाने समजाविल्यानंतर रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. राहुल सिंह हे माजी केंद्रीय मंत्री उमा भारती यांचे भाचे आहेत. पोलिसांनी राहुल सिंह लोधी यांच्यावर 304 अ, 279/337 आणि 184 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, घटनेच्यावेळी आपण गाडी चलवत नव्हतो तर चालक गाडी चालवत होता असे आमदार राहुल सिंह लोधी यांनी सांगितले. तर मृतांच्या नातेवाईकांनी राहुल सिहं लोढी हेच गाडी चालवत असल्याचा दावा केला आहे. लोधी यांनी गावातील लोक आपल्याला अडकविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला असून या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नसल्याचे लोढी यांनी सांगितले.

Visit : Policenama.com