‘आरोग्यमंत्री गांजा ओढून प्रेस घेतात का?’; गोपीचंद पडळकरांचा टोला

सांगली : राज्यात लसींअभावी 1 मेपासून 18 वर्षांवरील सर्वांचे लसीकरण होणार नसल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले. त्यावरून विरोधकांकडून ठाकरे सरकारवर टीका केली जात आहे. त्यानंतर आता भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना टोला लगावला. ‘सकाळी जी प्रेस घेतली होती, ती गांजा ओढून घेतली होती का’?, असे ते म्हणाले.

राज्यात कोरोना व्हायरसचे थैमान सुरु आहे. रुग्णसंख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. ही रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी लसीकरणाची व्याप्ती वाढवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार, 18 वर्षांवरील सर्वांचे लसीकरण केले जाणार असल्याचे म्हटले होते. मात्र, आता कोरोना प्रतिबंधक लसींअभावी राज्यातील हे लसीकरण होणार नसल्याचे सांगितले. त्यावरून पडळकर यांनी निशाणा साधला. ते म्हणाले, ‘काल सकाळी राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी घोषित केले, की एक तारखेपासून आम्ही 18 ते 45 वयोगटातील लोकांचे लसीकरण करणार आहोत. नंतर 4 वाजता सांगितले की ते करता येणार नाही. म्हणजे हे लोक पुरते गोंधळलेले आहेत. सकाळी जी प्रेस घेतली होती, ती गांजा ओढून घेतली होती का?’

तसेच कोणतीही विचारधारा, अजेंडा नसताना हे तिन्ही पक्ष एकत्र आले आहेत. भारतीय जनता पार्टीची जिरवण्यासाठी ते एकत्र आले आहेत. मात्र, भाजपचे काम चांगले आहे. त्यामुळे त्यांना ते जमले नाही. पण महाराष्ट्रातील जनतेचं जिरवण्याचं काम या सरकारने केले आहे, असेही पडळकर यांनी सांगितले.