जवानांच्या पत्नीबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्या परिचारकांचे निलंबन मागे

मुंबई : पोलीसनामा ऑलनाईन – भारतीय जवानांच्या पत्नीबाबत वादग्रस्त विधान करणारे भाजप पुरस्कृत अपक्ष आमदार प्रशांत परिचारक यांचे निलंबन अखेर आज (गुरुवार) विधान परिषदेत मागे घेण्यात आले. परिचारक यांनी २०१७ मध्ये एका सभेमध्ये जवानांच्या पत्नीसंदर्भात वादग्रस्त विधान केले होते. यानंतर त्यांच्यावर सर्वच स्तरातून टीका करण्यात आली होती. अखेर त्यांना दीड वर्ष निलंबित करण्यात आले होते.

आमदार प्रशांत परिचारक यांनी देशाच्या सीमेवर संरक्षण करणाऱ्या जवानांच्या पत्नींच्या चारित्र्या संदर्भात निवडणूक प्रचार सभेत बेताल वक्तव्य केल्याने ते वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. पंढरपूर तालुक्यातील भोसे येथील सभेत ते म्हणाले होते, की पंजाब मधला जवान असतो सीमेवर आणि त्याची बायको इकडे बाळंतीण होते. तुम्हाला मुलगा झाला अशी त्याला तार येते. वर्षभर तो गावाकडे गेलेला नसतो आणि तिथे तो पेढे वाटतो. लोक म्हणतात, काय झालं तो सांगतो मला मुलगा झाला. असे सगळे राजकारण आहे. या वक्तव्यानंतर राज्यभरातून त्यांच्यावर टीका करण्यात आली होती.

परिचारक यांना दीड वर्ष निलंबित करण्यात आले होते. आता निवडणुकीच्या तोंडावर हे निलंबन मागे घेण्यात आले आहे. आज विधान परिषदेत गोंधळातच सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात आले. १७ जूनला उर्वरित अर्थसंकल्प अधिवेशन होणार आहे. परिचारक यांच्या निलंबनानंतर संतप्त रावते यांनी सभापती रामराजेंच्या दालनात जाऊन आक्षेप नोंदवला, तर विनायक मेटेंनाही लॉबीत जाऊन जाब विचारला.