बीडचा ‘पोपट’ त्यांना मिठू-मिठू बोलला ; त्यामुळे मला पक्षातून बाहेर पडावे लागले : सुरेश धस
सुरेश धसांच्या धनंजय मुंडेंना कानपिचक्या
बीड : पोलीसनामा ऑनलाईन – भाजपचे आमदार सुरेध धस यांनी विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांचे नाव न घेता कडा येथील सभेत निशाणा साधला. ते म्हणाले सर्वांच्या मागून आलेला पोपट राजाच्या कानात मिठू मिठू बोलत आहे. त्यामुळे मला पक्षातून बाहेर पडावे लागले, अशा शब्दात त्यांनी निशाणा साधला. बीडमधील कडा येथे आयोजित सभेत सुरेश धस बोलत होते.
धस यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत भाषण करताना राष्ट्रवादी आणि पक्षातील नेत्यावर टीका केली. पशु-पक्षांचा छंद असलेल्या राजाची गोष्ट त्यांनी यावेळी सांगितली. सर्वात शेवटी आलेला पोपट राजाच्या कानात मिठू-मिठू बोलत असून त्यामुळेच आपल्याला पक्षातून बाहेर पडावे लागल्याचे धस म्हणाले. जयदत्त क्षीरसागर यांच्या घरात वाद लावल्याचे खापरही धसांनी ‘मिठू’च्या नावावर फोडले.
शरद पवार यांचे नाव घेता त्यांनी एक गोष्ट सांगून त्यांच्यावरही टीका केली. एका राजाला पशु-पक्ष्यांचा छंद होता. सर्वांना राजाकडून सारखी माया लावली जात होती. पण शेवटी आलेल्या पोपटावर राजाचा खूपच जीव जडला. पोपट राजाच्या कानात मिठू मिठू बोलत आहे. राजालाही फक्त त्याचेच खरं वाटायला लागलं. त्यामुळे आपल्याला पक्षातून बाहेर पडावे लागले. तसेच जयदत्त क्षीरसागर यांच्या घरातलं भांडणही त्यामुळेच लागले असल्याचा टोला धस यांनी लगावला.
येत्या लोकसभा निवडणुकीनंतर हा पोपट नसेल असा विश्वासही धस यांनी यावेळी व्यक्त केला. बीडमध्ये भाजपने विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादीने बजरंग सोनावणे यांना त्यांच्या विरोधात उमेदवारी दिली आहे. मात्र, राष्ट्रवादीला खिंडार पाडत जयदत्त क्षीरसागर यांनी बंडाचे निशाण फडकावलं आहे.