भाजपची ‘गाडी’ रूळावर आणण्यासाठी मनसेचं ‘इंजिन’ ? नाशिकमध्ये दोन्ही पक्षांच्या नेत्यांची ‘खलबतं’

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – सत्तास्थापनेचा घोळ सुटत नसताना शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचे सुत जुळता दिसत आहे. परंतू महापालिका स्तरावर राजकारणात आता वेगळे सुर जुळण्यास सुरुवात झाली आहे. एकीकडे महाशिवआघाडी भाजपची कोंडी करत असताना आता भाजपने लक्ष केंद्रीत केले आहे ते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकांवर.

राजस्थानात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक भाजपला झटका बसल्यानंतर भाजप राज्यात मात्र सावध झाले आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीत मनसेच्या इंजिनाबरोबर भाजप युती करण्याच्या प्रयत्नात आहे. नाशिकमध्ये 22 तारखेला महापौरपदासाठी निवडणूका पार पडणार आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि मनसेच्या नेत्यांची नाशिकमध्ये महत्वाची बैठक पार पडली.

नाशिकमध्ये मनसे कार्यालयात मनसे आणि भाजपात महापौर पदावरुन चर्चा झाली. या निवडणूक भाजप मनसे असे समीकरणं दिसेल अशी शक्यता आहे. मनसेच्या पाठिंब्यासाठी भाजपचे प्रयत्न आहेत. नाशिक पालिकेच्या स्थायी समितीचे सभापती उद्वध निमसे आणि नेते शिवाजी गांगुर्डे हे भाजपचे प्रतिनिधी म्हणून मनसेच्या नेत्यांंबरोबर चर्चेला गेले होते. यात मनसेच्या 5 नगरसेवकांची भूमिका महत्वाची असणार आहे. त्यामुळे आता भाजप विरुद्ध महाशिवआघाडी असे चित्र सर्वत्र दिसणार असताना नाशिकात मनसे कोणाला साथ देणार हे महत्वाचे ठरेल.

राज्यात महाशिवआघाडीकडून सत्तास्थापनेचे प्रयत्न करणार असताना नाशिकात महापालिकेत देखील हाच फॉर्म्युला वापरला जाऊ शकतो. भाजपला खिंडीत गाठण्याचा काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे यांचा प्रयत्न आहे. भाजपने तर आपले नगरसेवक फुटू नये म्हणून त्यांना सहलीला पाठवले आहे. भाजप आता कोणताही धोका पत्करु शकत नाही. भाजपसाठी डोकेदुखी म्हणजे भाजपातून राष्ट्रवादी मार्गे शिवसेनेत गेलेल्या बाळासाहेब सानप यांचे 7 नगरसेवक समर्थक हे काही दिवसांपासून गायब आहेत. ही खेळी शिवसेनेची असल्याची चर्चा रंगली आहे.

बाळासाहेब सानप हे भाजप पूर्व नाशिकचे आमदार होते, परंतू पक्षाने तिकीट नाकारल्याने त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करुन निवडणूक लढली परंतू पराभूत झाले. त्यानंतर फक्त 8 दिवसात त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. महापालिकेत सानप यांचा प्रभाव आहे. त्यामुळे भाजपला भीती आहे की ते भाजपचे 14 नगरसेवक फुटू शकतात.

या काळात शिवसेना सानप यांच्या मोठा उपयोग करुन घेऊ शकतात. त्यामुळे शिवसेनेच्या हालचालींना वेग आला आहे. कारण युतीत मीठ पडल्यानंतर शिवसेनेने आपली वेगळी समीकरणं चाचपण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे बाळासाहेब सानप यांची भूमिका निर्णायक असेल. त्यामुळे भाजप नेते गिरीश महाजन यांची कसोटी लागणार आहे.

Visit : Policenama.com