Coronavirus : भाजप खा. सनी देओल ‘काेराेना’ पाॅझिटिव्ह; BJP चे राज्यसभा खासदार अभय भारद्वाज यांचे निधन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अभिनेता आणि भाजप खासदार सनी देओल यांचा कोरोना अहवाल सकारात्मक आला आहे. हिमाचल प्रदेश आरोग्य सचिवांनी सनी देओल यांचा चाचणी अहवाल सकारात्मक आल्याची माहिती दिली, तर दुसरीकडे गुजरात भाजपचे राज्यसभा खासदार अभय भारद्वाज यांचे कोरोनाने निधन झाले आहे.

काही दिवसांपूर्वी सनी देओल यांच्यावर मुंबईत खांद्याची शस्त्रक्रिया करण्यात आलेली. त्यानंतर ते विश्रांतीसाठी मनालीतील कुल्लूमधील फार्महाउसवर राहायला गेले होते. सनी देओल आणि त्यांचे मित्र मुंबईत जाण्याचे नियोजन करत असतानाच त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे कुल्लूचे मुख्य वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले. सध्या सनी देओल यांच्यावर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार सुरू आहेत.

तर गुजरात भाजपचे राज्यसभा खासदार अभय भारद्वाज यांचे मंगळवारी चेन्नईत कोरोनाने निधन झाले. कोरोनाची लागण झाल्यानंतर त्याची प्रकृती ढासळत गेली. अभय भारद्वाज यांच्या निधानबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला.

३१ ऑगस्टला अभय भारद्वाज यांचा कोरोना चाचणी अहवाल सकारात्मक आला होता. त्यानंतर त्यांच्यावर राजकोटच्या रुग्णालयात उपचार सुरू होते. पण प्रकृती ढासळल्याने त्यांना पुढील उपचारासाठी चेन्नईत दाखल करण्यात आले. भारद्वाज यांच्या कुटुंबातील सर्वांचे कोरोना अहवाल सकारात्मक आले असून, त्यांच्यावरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, यापूर्वीसुद्धा कोरोनाने अनेक मातब्बर नेत्यांचे निधन झाले आहे.

You might also like