‘आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्यास चिघळण्याची शक्यता जास्त’, छत्रपती संभाजीराजेंचा इशारा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मराठा समाजाला मिळालेल्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली. त्यानंतर समाजात अस्वस्थतेचं वातावरण तयार झालं आहे. त्यामुळं समाजातील संघटनांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे. जिल्हास्तरावर सकल मराठा समाजाच्या बैठका होत आहेत आणि आंदोलनाची दिशा ठरत आहे. परंतु पोलीस प्रशासनानं काही आंदोलकांना नोटीस बजावणं सुरू केलं आहे असं सांगत खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहलं आहे.

या पत्रात संभाजीराजे म्हणतात, “नाशिक, पुणे आणि मराठवाड्यातील आंदोलकांना पोलीस प्रशासनानं वैयक्तीक फोन करून आणि नोटीसी बजावून आंदोलकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मराठा समाज हा आक्रमक म्हणून ओळखला जातो. जिथं अन्याय झाला तिथं न्यायाची बाजू घेऊन लढणारा हा समाज आहे. मग तेव्हा त्यानं कधीच जात, पात, धर्म पाहिला नाही. सर्वांसाठी लढण्याची भूमिका घेतली. आज हा लढा स्वत:साठी उभारण्याची वेळ आली आहे.”

पुढे बोलताना ते म्हणाले, “देशरक्षणार्थ कायमच सज्ज राहणारा हा समाज कायद्याचं पालन करणारा आहे. मूक मोर्चावेळी सर्व जगानं ते पाहिलं आहे. न्याय्य हक्कासाठी लोकशाही मार्गानं लढा उभारणं हा प्रत्येक व्यक्ती आणि समाजाचा अधिकार आहे. त्या अधिकाराची गळचेपी न करता मराठा समाजाला आपली नाराजी व्यक्त करण्याची मुभा द्यावी. त्यावरही जर प्रशासनानं सहकार्य न करता जर आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला तर ते चिघळण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळं आंदोलकांना पोलीस आणि प्रशासनानं सन्मानाची वागणूक द्यावी” अशी मागणीदेखील त्यांनी केली आहे.