‘मी काय भाजपचा ठेका घेतलेला नाही’, छत्रपती संभाजीराजे संतापले (व्हिडीओ)

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – मराठा आरक्षणासाठी मी महाराष्ट्र पिंजून काढतो आहे. अभ्यासू लोकांशी चर्चा सुरु आहे. येत्या 27 मे रोजी मुंबईत मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षांना भेटणार असून यानंतर मुंबईत स्पष्ट भूमिका मांडणार असल्याचं खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटले आहे. तसेच कोणी माघार घेतली तर बघाच असा इशारा आमदार आणि खासदारांना दिला आहे. यावेळी त्यांनी पक्षाला घरचा आहेर देत तोडगा सांगा, मराठा समाजाला न्याय कसा मिळवून देऊ शकतो यावर बोला, असे आवाहन करत मी काही भाजपचा ठेका घेतलेला नाही, अशा शब्दांत त्यांनी सुनावलं. ते नाशिकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

भाजपने आंदोलनात सहभागी होण्याची भूमिका घेतली आहे, असे विचारले असता ते म्हणाले, त्यांची भूमिका त्यांनी बघावी. मी काय त्यासाठी ठेका घेतलेला नाही. तोडगा काय आणि मराठा समाजाला न्याय कसा मिळवून देऊ शकतो यासंबंधी बोला. मागच्या सरकारने बोगस कायदा केला की आताच्या सरकारने योग्य मांडणी केली नाही, याच्याशी आम्हाला काहीही करायचं नाही, असेही खासदार छत्रपती संभाजीराजे म्हणाले.

आंदोलन कसं करायचे हे शिकवू नये

आंदोलन कसे करायचे आम्हाला सांगण्याची गरज नाही, असे सांगत मी शांत आहे, संयमी आहे, शिवाजी महाराज व शाहू महाराज यांचे आपल्यावर संस्कार आहेत, असे त्यांनी म्हटले. शिवाजी महाराजांनी वेळप्रसंगी अनेक वेळा तह केले. सध्याची परिस्थिती पहाता लोकांचा जीव वाचवण्याची गरज आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मी तज्ज्ञांशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

एकमेकांवर जबाबदारी झटकत आहेत

सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्यानंतर मागील काही दिवसांत राज्य आणि केंद्रात आरोप प्रत्यारोप सुरु असून एकमेकांवर जबाबदारी झटकत आहेत. कोणी ही राज्याची जबाबदारी आहे तर कोणी केंद्राची जबाबदारी असल्याचे सांगत आहे. मराठा समाजाला याच्याशी काही देणं घणं नसून तुम्ही मार्ग काय कढून देणार आहात ते सांगा, अशी आक्रमक विचारणा त्यांनी केली.

 

 

 

 

 

 

तर हा संभाजी महाराज आडवा येईल

मराठा समाजाची दिशाभूल करण्याचा कोणी प्रयत्न केला तर त्याला हा संभाजी महाराज आडवा येईल, असा इशारा त्यांनी दिला. अजून मी आक्रमक झालेलो नाही, त्यासाठी दोन मिनिटं लागतात. पण हे मला सिद्ध करण्याची गरज नाही. 27 तारखेपर्यंत मराठा समाज काय कराणार हे सर्वांना समजेल. पण तोपर्यंत मराठा समाजाने शांत रहावं, आपला जीव धोक्यात घालू नका, असं आवाहन यावेळी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केले.