भाजपा खासदाराला ‘मोबाईल’ ऐवजी मिळाला ‘दगड’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ऑनलाईन खरेदी करण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. त्याचबरोबर या ऑनलाईन खरेदीत फसवणुकीचे प्रमाणही वाढत चालले आहे. ऑनलाईन खरेदीसाठीची सर्वात मोठी साईट असलेल्या अ‍ॅमेझॉन या साईटवरुन एका भाजपा खासदारालाच चुना लागला आहे.

मालदा उत्तर येथील खगेन मुर्म या खासदारांना अ‍ॅमेझॉनचा हा अनुभव आला. खगेन हे तीन वेळा आमदार आणि आता खासदार आहेत. त्यांनी दिवाळीमध्ये एका नातेवाईकाला भेट देण्यासाठी म्हणून ऑनलाईन मोबाईल ऑर्डर केला होता. ही खरेदी करताना त्यांनी पैसे देण्यासाठी कॅश ऑन डिलिव्हरी हा पर्याय निवडला होता.

ऑर्डर प्रमाणे त्यांच्यापर्यंत बॉक्स आला. त्यांनी डिलिव्हरी बॉयला पैसे दिले व बॉक्स ठेवून घेतला. मात्र, डिलिव्हरी घेताना त्यांनी बॉक्स उघडून पाहिला नव्हता. दुसऱ्या दिवशी त्यांनी बॉक्स पाहिल्यावर तो वेगळ्याच कंपनीचा असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी बॉक्स उघडल्यावर आत मोबाईल ऐवजी चक्क दगड असल्याचे दिसून आले.

खगेन मुर्म यांनी याबाबत सांगितले, की हा सर्व प्रकार अतिशय धक्कादायक आहे. आपण पोलिसांकडे तक्रार केली आहे. यापूर्वी आपण कधीही काहीच ऑनलाईन मागविले नव्हते. या प्रकारची माहिती आपण ग्राहक तक्रार निवारण आणि त्याच्याशी संबंधित खाते हाताळणाऱ्या केंद्रीय मंत्र्यांकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Visit : Policenama.com