सातार्‍यातील शरद पवारांच्या सभेवर पुण्याचे खा. गिरीश बापट यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या साताऱ्यातल्या सभेचं सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. भर पावसात सभा घेत शरद पवारांनी कार्यकर्त्यांना संबोधीत केले. यावर भाष्य करताना खासदार गिरीश बापट म्हणाले, शरद पवारांनी पावसात सभा घेतली त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांचे मनोबल वाढेल, पण मतदारांवर परिणाम होणार नाही. राष्ट्रवादीच्या अस्तित्वाचीच ही लढाई आहे. राष्ट्रवादी निदान लढली, मात्र काँग्रेस कुठं दिसलीच नाही असे बापट यांनी म्हटले.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे. सायंकाळी राज्यातील प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. त्यामुळे पक्षांचे प्रमुख नेते सभा घेत असून आपल्या प्रचार सभांमधून विरोधकांवर आरोप करताना दिसत आहेत. अखेरच्या दिवशीही आरोप-प्रत्यारोपांनी जणू स्पर्धाच लागली असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले उमेदवार प्रतिस्पर्धी उमेदवारांना घायाळ करण्याची एकही संधी सोडताना दिसत आहे.

भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी प्रचाराच्या अखेरच्या दिवशी राष्ट्रवादीवर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. शरद पवार यांनी ईडीला अंगावर घेऊन माहोल तयार केला होता. पण नाराज अजित पवारांनी त्याला छेद दिला. अजित पवारांना जगावाटपात डावलले गेले त्याचा फटका राष्ट्रवादीला बसेल, असे सांगत राष्ट्रवादीच अंतर्गत कलह असल्याचे बापट यांनी सांगितले. अखेरच्या दिवशी गिरीश बापट यांनी केलेल्या टीकेला अजित पवार कशा प्रकारे उत्तर देतात हे येत्या काळात समजेल.