‘राजकारणापेक्षा मठच बरा होता’ – डॉ. महास्वामी

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – लोकसभा निवडणुकीत बनावट जात प्रमाणपत्र सादर केल्याने सोलापूरचे भाजप खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी चांगलेच अडचणीत आले आहेत. या प्रकरणी खासदार महास्वामी यांची पोलीस आयुक्तालयात गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजय साळुंखे यांनी बुधवारी (दि. 3) तब्बल दोन तास चौकशी केली. चौकशीत खासदार महास्वामी यांनी काय जबाब दिला हे समजले नाही. मात्र का म्हणून राजकारणात पडलो ? आपले धार्मिक कार्य बर होते, राजकारणापेक्षा मठच बरा होता असे म्हणत डोक्‍याला हात लावल्याचे समजते.

2019 च्या लोकसभा निवडणूकीत सोलापूर मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी आरक्षित होता. खासदार महास्वामी यांनी त्यांचा अनुसूचित जातीमधील दाखला बेडा जंगम असल्याचे प्रमाणपत्र सादर केले होते. या प्रमाणपत्राला विनायक कंदकोरे, प्रकाश गायकवाड, मऱ्याप्पा मुळे यांनी हरकत घेतली होती. मात्र ही हरकत फेटाळली होती. तेंव्हा महास्वामी हे निवडून आले. याबाबत रिपाईचे प्रमोद गायकवाड व मूळ तक्रारदारांनी सामाजिक न्याय विभागातील जात पडताळणी विभागाकडे तक्रार केली होती. जात पडताळणी समितीने चौकशी केली असता त्यात उमरगा व अक्कलकोट तहसीलमध्ये बनावट नोंदी झाल्याचे आढळले. समितीने तत्कालीन तहसीलदारांना जात प्रमाणपत्र बनावट असल्याचे कळवून तक्रार देण्याचे आदेश केले. तत्कालीन तहसीलदारांनी याबाबत न्यायालयात तक्रार दाखल केली होती. न्यायालयाने ही तक्रार सदर बाजार पोलिसात पाठवून त्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. न्यायालयाच्या आदेशावरून खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी, अक्कलकोट आणि उमरगा येथील तहसील कार्यालयातील अज्ञात प्रशासकीय अधिका-या विरोधात गुन्हा दाखल केला होता. तसेच याप्रकरणी शिवसिद्ध बुळ्ळा यांच्यावर संशय बळावला आणि त्याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे.