देशात लसीकरण सुरु, भाजप खासदाराचे ‘कोरोना’मुळे निधन

खंडवा/मध्य प्रदेश : वृत्तसंस्था – देशात सोमवारपासून कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु झाला आहे. मात्र, दुसरीकडे देशात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली असतानाच कोरोनामुळे भाजप खासदाराचे निधन झाले आहे. नंदकुमार सिंह चौहान असे मृत्यू झालेल्या भाजप खासदाराचे नाव आहे. चौहान हे मध्यप्रदेशमधील खंडवाचे खासदार आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची बाधा झाली होती.

नंदकुमार सिंह चौहान हे भाजपचे ज्येष्ठ नेते होते. त्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर दिल्लीतील मेदांत रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. नंदकुमार सिंह चौहान हे सहावेळा खासदार म्हणून निवडून आले होते. तर दोन वेळा त्यांनी आमदारकी भुषवली होती. तसेच चौहान सरकारमध्ये ते मंत्री देखील राहिले होते.तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्षपद सुद्धा भुषवले होते.

दरम्यान, सोमवार (दि. 1 मार्च) पासून देशभरात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु करण्यात आला आहे. 60 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना कोरोना लस देण्यात येणार आहे. 45 पेक्षा जास्त वयाच्या व्यक्ती ज्यांना इतर आजार आहेत, त्यांनाही कोरोना लस दिली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वत: लस घेऊन देशभरातील सर्वसामान्य नागरिकांनी लस घ्यावी असे आवाहन केले आहे.