नारायण राणे यांची CM ठाकरेंवर खोचक टीका; म्हणाले- ‘अब तो एक ढुंढो हजार मिलते है, और तो घर में ही…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजप नेते नारायण राणे आणि शिवसेना हा फार जुना वाद आहे. राणे कुटुंबीय आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात विविध मुद्यांवरून सातत्याने आरोप, प्रत्यारोप व टीका होत असतात. अशातच नारायण राणेंनी थेट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विधानाच्या माध्यमातूनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. अब तो एक ढुंढो हजार मिलते है, और तो घर में ही दो दो बसते है, अशी खोचक टीका राणेंनी ठाकरे पिता-पुत्रावर केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वैद्यकीय महाविद्यालयाच्या मुद्द्यावरून नारायण राणे यांच्यावर निशाणा साधला होता. त्यानंतर राणेंनीही ठाकरे यांच्यावर पलटवार केला होता. त्यानंतर राणेंनी आपल्या मालकीच्या दैनिक प्रहारमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा एक किस्सा छापला आहे. त्यात राणेनी म्हटले आहे की, बाळासाहेब, आपण व्यंगचित्र करण्याचे काम कमी केलेत. या प्रश्नास उत्तर देताना बाळासाहेब खंत व्यक्त करत म्हणत, व्यंगचित्र काढण्यासारखे चेहरे राहिले नाहीत. त्या उंचीचे व्यक्तिमत्त्व आता नजरेला पडत नाहीत. दर्जेदार विषयही सापडत नाहीत. विकृत आणि विदूषक कमी झाले. आज बाळासाहेब असते तर उत्स्फूर्तपणे कुंचला उचलला असता अन् दिवसागणिक शेकडो व्यंगचित्रे केली असती. अब तो एक ढुंढो हजार मिलते है, और तो घर में ही दो दो बसते है, अशी खोचक टीका राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर केली आहे. तसेच बाळासाहेब ठाकरे यांचा व्यंगचित्र काढतानाचा फोटो छापला असून, त्यावर अब तो एक ढुंढो हजार मिलते है, असे लिहिले आहे. फोटोला आज बाळासाहेब असते तर…अशी ओळ दिली असून शेवटी खासदार नारायण राणे यांच्या संग्रहातून असे म्हटले आहे.